अमोल पवारला साक्षीदाराने ओळखले
By admin | Published: May 1, 2016 12:59 AM2016-05-01T00:59:19+5:302016-05-01T00:59:19+5:30
सेंट्रिंग कामगार खून प्रकरण : आरोपीची ओळख परेड
कोल्हापूर : गडहिंग्लज-चंदगड रस्त्यावरून जाताना कडगाव येथे क्रशर खडी फोडण्याचा कारखाना आहे. या कारखान्यातून रमेश नाईक याला घेऊन जाताना संशयित आरोपी अमोल पवारला मी स्वत: पाहिले आहे. असे त्याच्याकडे बोट करून प्रत्यक्षदर्शी एका साक्षीदाराने सांगितले. संशयित आरोपीची ओळख परेड आजऱ्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासमोर शनिवारी बिंदू चौक कारागृहात दुपारी दोन वाजता झाली. यावेळी अन्य तीन साक्षीदार फितूर झाले. त्यांनी आम्ही ओळखत नसल्याचे सांगितले. या संपूर्ण ओळख परेडचा रिपोर्ट तहसीलदार ठोकडे यांनी बंद लखोट्यातून न्यायालयाकडे सादर केला.
कडगाव येथील क्रशर खडी फोडण्याच्या कारखान्यातून दि. २८ फेब्रुवारीला अमोल पवार याने आपल्या आय-२० या कारमधून रमेश नाईकला चरखुदाईच्या कामाचे आमिष दाखवून नेले. त्यानंतर स्वत:च्या मृत्यूचा बनाव करण्यासाठी आजरा-आंबोली मार्गावर हाळोली फाट्यानजीक आय-२० कारसह रमेशला जाळून मारले. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अमोलसह त्याचा भाऊ विनायक पवार या दोघांना अटक केली. रमेशला अमोल पवार घेऊन जाताना ५० ते ६० प्रत्यक्ष साक्षीदारांनी पाहिले आहे. त्यामुळे पवार याची ओळख परेड घेण्यासाठी पोलिसांनी आजऱ्याचे प्रथमवर्ग न्यायाधीश एस. यु. महादार यांच्याकडे अर्ज दाखल केला होता. मंजुरीनंतर शनिवारी ओळख परेड घेण्याचा निर्णय झाला.
अशी झाली ओळख परेड
पोलिस उपनिरीक्षक सचिन पंडित हे शनिवारी दुपारी चौघा प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांना घेऊन बिंदू चौक कारागृहात गेले. यावेळी त्यांच्यासोबत आजऱ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, सरकारी पंच विक्रीकर अधिकारी शंकर पाटील, प्रशांत चव्हाण होते. कारागृह प्रशासनाच्या परवानगीनंतर सर्वांना आतमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी चौघा साक्षीदारांच्या समोर एका रांगेत वेगवेगळ्या चेहऱ्याच्या दहा संशयितांना उभे केले. तहसीलदार ठोकडे यांनी एका लहान मुलासह चौघा साक्षीदारांना रमेश नाईक याला घेऊन गेलेला आरोपी यापैकी कोण आहे? अशी विचारणा केली. त्यावर लहान मुलासह तिघांनी यापैकी आम्ही कोणालाच ओळखत नसल्याचे सांगितले; परंतु चौथ्या साक्षीदाराने सर्वांकडे नजर फिरवत अमोलवर रोखली.
साक्षीदार फितूरची भीती नाही
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दिनकर मोहिते यांनी यापूर्वी संशयित अमोल पवार याची कलम १६४ नुसार आजऱ्याचे प्रथमवर्ग न्यायाधीश महादार यांच्यासमोर ओळख परेड घेतली आहे. यावेळी आताच्या चौघाही साक्षीदारांनी रमेश नाईक याला अमोल पवार घेऊन जाताना आम्ही पाहिले असल्याचा कबुली जबाब दिला आहे. त्यापैकी तीन साक्षीदार तहसीलदारांच्या ओळख परेडमध्ये फितूर झाले. या साक्षीदारांचा आरोपीला फायदा होईल असे नाही. कारण त्यांनी यापूर्वी न्यायालयासमोर कबुली जबाब दिल्याने न्यायालयात तो ग्राह्य धरला जाईल. साक्षीदार फितूर झाले तरी या गुन्ह्याच्या खटल्यावर कोणताही परिणाम होणार नाही. आम्ही तपासामध्ये भक्कम पुरावे न्यायालयासमोर ठेवले आहेत, असे पोलिस निरीक्षक मोहिते यांनी सांगितले.