हिणवणाऱ्यांकडूनच शाबासकी
By admin | Published: December 24, 2014 11:52 PM2014-12-24T23:52:25+5:302014-12-25T00:01:51+5:30
यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...
सत्तरीच्या सुरुवातीला ‘रोव्हर्स’ चषक खेळण्यासाठी माझी निवड झाली. आमचा सामना ‘महिंद्रा अॅँड महिंद्रा’ या बलाढ्य संघाबरोबर होणार होता. मैदानात प्रवेश करताना आम्हाला प्रेक्षकांतून ‘जाओ चप्पल बनाओ, कुस्ती खेलो’ असे आम्हाला कोल्हापूरचे खेळाडू म्हणून हिणवले व हा सामना आम्ही जिंकला. हा किस्सा सांगितला ‘मेनन अँड मेनन’चे माजी फुटबॉलपटू शरद मंडलिक यांनी.
मला फुटबॉलची गोडी माझे मामा आप्पासाो व यशवंतराव सूर्यवंशी यांच्यामुळे लागली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मीही प्रॅक्टिसकडून फुटबॉल खेळू लागलो.‘केएसए’मधून रोव्हर्स कप खेळण्यासाठी माझी निवड झाली. मी उदय भोसले, अरुण नरके अशा दिग्गज मंडळींबरोबर मुंबई येथे रोव्हर्स खेळण्यासाठी कुपरेज मैदानावर दाखल झालो.
आमचा सामना दिग्गज अशा महिंद्रा अॅँड महिंद्राबरोबर होता. प्रेक्षकांतून कोणीतरी ‘जाओ चप्पल बनाओ, कुस्ती खेलो’ असे आम्हाला कोल्हापूरचे खेळाडू म्हणून हिणवले. त्याचा डोक्यात राग घेऊन आम्ही हा सामना ईर्षेने खेळत जिंकला. जिंकल्यानंतर त्याच प्रेक्षकांनी आम्हाला डोक्यावर घेत आमच्या खेळाडूंना शाबासकीही दिली.
मी प्रॅक्टिसकडून खेळताना हॅँगिग बॉल मारण्यात तरबेज होतो. फुटबॉलमुळे मला मेनन अॅँड मेनन येथे नोकरी लागली. आजच्या खेळाडूंकडे शॉर्ट पासिंग करण्याचे तंत्र चांगले आहे. मात्र, गोल करण्यात त्यांना समन्वयाअभावी यश येत नाही.
- शब्दांकन: सचिन भोसले