खासगी सावकारी; कोल्हापुरात महिलेस अटक, दिले ३५ हजार अन् घेतले २ लाख ४५ हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 12:42 PM2022-03-21T12:42:48+5:302022-03-21T12:44:15+5:30
आमचा मुलगा गुंड आहे. तो काय करतो ते बघ तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशीही दिली धमकी
कोल्हापूर : खासगी सावकरी, जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपाखाली टिंबर मार्केट परिसरातील महिलेस जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली. मंगल शिवाजी चौगुले (वय ४७, रा. टिंबर मार्केट, कोल्हापूर ) असे तिचे नाव आहे. तिला २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, टिंबर मार्केटमधील गंजीमाळमधील अलका मच्छिंद्र कांबळे यांना पतीच्या औषधोपचारासाठी पैशाची गरज होती. म्हणून त्यांनी मंगल हिच्याकडून २०१९ मध्ये ३५ हजार रुपये घेतले. यावर अलका यांनी महिन्याला २० टक्क्यांप्रमाणे महिन्याला ७ हजार रुपये व्याज दिले. मुद्दलीचे ३५ हजार रुपयेही दिले. व्याजापोटी २ लाख ४५ हजार दिले. तरीही मंगलने वेळोवेळी व्याजाच्या रकमेसाठी अलका यांच्याकडे तगादा लावून शिवीगाळ केली.
घेतलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम दिल्याचे सांगितल्यावरही शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अलका यांच्या घराच्या दारात येऊन मंगलने अजूनही ५६ हजार रुपये येणे बाकी आहे, असे सांगून अलका, त्यांची मुले, सुनेला शिवीगाळ आणि दमदाटी केली. ५६ हजार रुपये दिले नाहीस तर नवरा, मुलांना, सुनेला सोडणार नाही. आमचा मुलगा अमित चौगुले गुंड आहे. तो काय करतो ते बघ तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन मंगल निघून गेली. याची अलका यांनी पोलिसात फिर्याद दिली.