करणी झाल्याचे सांगून महिलेची लाखांची फसवणूक -: तलाठ्यासह महिला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 01:03 AM2019-09-24T01:03:03+5:302019-09-24T01:04:57+5:30

संशयित अर्चना व राजश्री यांचा परिचय होता. राजश्री एका इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला होत्या. तेथे ग्राहक म्हणून येणाऱ्या अर्चना हिच्याशी राजश्री यांची ओळख झाली. राजश्री यांना आजारातून बरे करण्यासाठी व अर्थप्राप्ती व्हावी, म्हणून हस्तरेषा बघून करणी झाल्याचे सांगितले.

A woman cheats lakhs of people for alleged wrongdoing | करणी झाल्याचे सांगून महिलेची लाखांची फसवणूक -: तलाठ्यासह महिला ताब्यात

करणी झाल्याचे सांगून महिलेची लाखांची फसवणूक -: तलाठ्यासह महिला ताब्यात

Next
ठळक मुद्देसावकारी, जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई

इचलकरंजी : येथील एका आजारी महिलेला करणी (चेटूकपणा) झाल्याची भीती घालून दोघांनी संगनमताने २१ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी गावभाग पोलिसांनी दोघांना सावकारी व जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ताब्यात घेतले आहे. अर्चना पांडुरंग यादव (वय ३७, रा. सांगली रोड) व साजणी (ता. हातकणंगले) येथील तलाठी सुनील खामकर (रा. इचलकरंजी) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत राजश्री राजू घाटगे (३७, रा. धान्य ओळ, इचलकरंजी) यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, संशयित अर्चना व राजश्री यांचा परिचय होता. राजश्री एका इलेक्ट्रॉनिक दुकानात कामाला होत्या. तेथे ग्राहक म्हणून येणाऱ्या अर्चना हिच्याशी राजश्री यांची ओळख झाली. राजश्री यांना आजारातून बरे करण्यासाठी व अर्थप्राप्ती व्हावी, म्हणून हस्तरेषा बघून करणी झाल्याचे सांगितले. ही करणी काढण्यासाठी राजश्री यांच्याकडून वेळोवेळी सुमारे सोळा लाख ६८ हजार इतकी रक्कम घेतली. त्यानंतर अर्चना आणि तिचा मित्र तलाठी सुनील खामकर यांनी संगनमताने प्रतिमहिना पाच टक्के व्याजदराने पाच लाखांची रक्कम राजश्री यांच्या नावाने घेतली आणि तिच्या वसुलीसाठी त्यांच्याकडे तगादा सुरू केला. त्यामुळे राजश्री यांच्याकडून त्यातील दोन लाख ७० हजार रुपये वसूल केले.

अशी एकूण २१ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे राजश्री यांची मानसिक स्थिती ढासळली. यातून त्यांनी आत्महत्या करण्याचे ठरविले होते. राजश्री यांच्या नातेवाइकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी गावभाग पोलीस ठाण्यात जाऊन तलाठी खामकर आणि जादूटोणा करणाºया अर्चना यादव हिच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात सावकारी, फसवणूक व जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी पत्रकारांना दिली.

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची शक्यता व्यक्त करून पोलिसांनी कोणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संशयित खामकर हा गेली काही वर्षे इचलकरंजीत तलाठी म्हणून काम पाहत होता. महिन्याभरापूर्वीच साजणी येथे तलाठी म्हणून बदली झाली आहे.

Web Title: A woman cheats lakhs of people for alleged wrongdoing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.