बाळंतपणातील उपचाराअभावी महिलेचा बाळासह मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 05:40 PM2020-08-21T17:40:13+5:302020-08-21T17:56:00+5:30
वारणानगर येथील रूग्णालयात
कोडोली : बाळंतपणासाठी दाखल करून न घेतल्याने बच्चे सावर्डे ता. पन्हाळा येथील गर्भवती महिलेचा बाळासह उपचाराअभावी मृत्यु झाला. ही घटना सोमवार दि१७ रोजी घडली. उपचार नाकारणाऱ्या डॉक्टर व हॉस्पीटल विरूध्द कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मृत्यू झालेल्या कोमल (वय २२) यांचे पती सचिन विश्वनाथ बच्चे सीमा सुरक्षा दलात कोलकाता येथे कार्यरत आहेत. कोमल या गर्भवती राहिल्या पासून वारणानगर येथील रूग्णालयात नियमीत तपासणी व उपचार घेत होत्या. डॉक्टरानी बाळतपणाच्या वेदना सुरु झाल्यावर रूग्णालयात येण्यास सांगितले होते. रविवार, दि.१७ रोजी रात्री वेदना जाणवू लागल्याने त्या रूग्णालयात आल्या.
रूग्णालयाचे गेट बंद असल्याने ते उघडण्याबाबत विनंती करण्यात आली. परंतु यावेळी त्यांना दुसऱ्या रूग्णालयात जा असे सांगण्यात आले. ते कोडोलीतील अन्य चार रूग्णालयात गेल्या. त्यांना विनंती केली असता त्यांनीही उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. अखेर त्यांनी उपचारासाठी कोल्हापूरला जाण्याचा निर्णय घेतला, परंतु कोल्हापूरला जात असताना कोमल यांचा बाळासह वाटेतच मृत्यू झाला.
बच्चे यांनी डॉक्टरांविरूद्ध कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, परंतु गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी सीपीआर रूग्णालयात तक्रार अर्ज पाठविला असून डॉक्टरांच्या समितीच्या निर्णयानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल असे सपोनि सुरज बनसोडे यांनी सांगितले.