मुलाचा सांभाळ करा, मी जीव देतेय म्हणत घेतली पंचगंगेत उडी, आंबेवाडीतील महिला बचावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:58 PM2022-03-12T13:58:18+5:302022-03-12T16:05:37+5:30
रागाच्या भरात वडिलांना फोन केला. पंचगंगा नदीत उडी घेत असल्याचे त्यांना सांगितले आणि धाडकन सिमेंटच्या पिलरवरून तिने पाण्यात उडी घेतली.
कोल्हापूर : मी पंचगंगा नदीत उडी घेऊन जीव देत आहे. माझ्या मुलाचा सांभाळ करा, असा वडिलांना फोन करून आंबेवाडी (ता. करवीर ) येथील एका महिलेने नदीतील पाण्यात उडी मारली. पण पोहणारी मुले आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस वेळीच मदतीला धावले. तिला पाण्याबाहेर काढल्याने ती वाचली. तिचे समुपदेशन करून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास घडली.
पोलिसांनी सांगितले की, आंबेवाडी सासर असलेल्या महिलेचा विवाह २०१२ साली झाला. तिला नऊ वर्षाचा मुलगा आहे. कौटुंबिक वादातून पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत होती. शुक्रवारी पती तिच्यावर रागावला. तो घरातून कामावर निघून गेल्यानंतर ती सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडली. पंचगंगा नदीजवळील आली. रागाच्या भरात वडिलांना फोन केला. पंचगंगा नदीत उडी घेत असल्याचे त्यांना सांगितले आणि धाडकन सिमेंटच्या पिलरवरून तिने पाण्यात उडी घेतली.
नदीत पोहणाऱ्या तरुणांनी तिला पाहिले व तातडीने जाऊन त्यांनी त्या महिलेला वेळीच बाहेर काढले. याची माहिती मिळताच गस्तीतील पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्या महिलेस उपचारासाठी दाखल होण्याची विनंती केली. मात्र ती नकार देत होती. तिची समजूत काढल्यानंतर तिने उपचार करून घेण्यास संमती दिली. तिला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. करवीर पोलिसांनी रात्री त्या महिलेच्या कुटुंबीयांना बोलवून घेतले.
गेल्या महिन्यातही पन्हाळा तालुक्यातील महिला व तिच्या मुलीस रंकाळा तलावात आत्महत्या करण्याच्या हेतूने आलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचविण्यात पोलिसांना यश आले होते.