Kolhapur: एसटीच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर जखमी; वाकरे-दोनवडे मार्गावर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 05:50 PM2023-05-03T17:50:38+5:302023-05-03T18:00:53+5:30
एसटी बस चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेला जात मोटर सायकलने येणाऱ्या या पती-पत्नीच्या थेट अंगावर गेल्याने यात अरुंधती जागेवरच ठार झाल्या
प्रकाश पाटील
कोपार्डे : तीव्र उतारावर एसटी बस चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटून दुचाकीस्वार दिलेल्या धडकेत एक महिला ठार झाली. तर पती गंभीर जखमी झाला. अरूंधती बाळासाहेब पाटील (वय ४८) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पती बाळासाहेब आकाराम पाटील (रा. कुडित्रे ता. करवीर) हे जखमीचे नाव आहे. कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर वाकरे दोनवडे दरम्यान आज, बुधवारी (दि.३) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, देवगड तुळजापूर एसटी बस कोल्हापूर कडे निघाली होती. याच दरम्यान बाळासाहेब पाटील हे पत्नीसह दुचाकीवरून कुडित्रे येथे आपल्या गावी निघाले होते. कोल्हापूर गगनबावडा मार्गावर दोनवडे वाकरे दरम्यान असलेल्या तीव्र उतारावर एसटी बस चालकाचे गाडीवर नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेला जात मोटर सायकलने येणाऱ्या या पती-पत्नीच्या थेट अंगावर गेल्याने यात अरुंधती जागेवरच ठार झाल्या. तर पती बाळासाहेब गंभीर जखमी झाले.
ही घटना घडल्यानंतर काही प्रवाशांनी तातडीने दोघा पती-पत्नींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. पण यात पत्नी अरुंधती पाटील यांचा उपचारापूर्वीच मृत झाल्याचे सांगण्यात आले. तर पती बाळासाहेब पाटील गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.