भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, देवदर्शन घेऊन परतणारी महिला ठार; सुदैवाने बालिकेसह मागे बसलेली महिला बचावली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 05:38 PM2022-12-12T17:38:14+5:302022-12-12T17:38:41+5:30

संकष्टीनिमित्त शहरातील ओढ्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन माघारी जाताना हा दुर्दैवी अपघात झाला

Woman killed in an accident on Shivaji University Road in Kolhapur | भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, देवदर्शन घेऊन परतणारी महिला ठार; सुदैवाने बालिकेसह मागे बसलेली महिला बचावली

भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, देवदर्शन घेऊन परतणारी महिला ठार; सुदैवाने बालिकेसह मागे बसलेली महिला बचावली

Next

कोल्हापूर : राजाराम कॉलेज ते शिवाजी विद्यापीठ रोडवर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार महिला ठार झाली, तर दुचाकीवर मागे बसलेली दुसरी महिला आणि चार वर्षांची बालिका सुदैवाने बचावली. शीतल सचिन कवडे (वय ३०, रा. दादू चौगुलेनगर, उजळाईवाडी, ता. करवीर) असे मृत महिलेचे नाव आहे. संकष्टीनिमित्त शहरातील ओढ्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन माघारी जाताना हा दुर्दैवी अपघात रविवारी (दि. ११) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडला.

या अपघातात मृत शीतल यांची चार वर्षांची बालिका इशिता आणि वैजयंता अशोक पाटील (वय ४८, रा. दादू चौगुलेनगर, उजळाईवाडी) या दोघी जखमी झाल्या.

घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, शीतल कवडे या त्यांची चार वर्षांची बालिका इशिता आणि शेजारच्या महिला वैजयंता पाटील यांना घेऊन रविवारी सकाळी दुचाकीवरून घरातून बाहेर पडल्या. टेंबे रोड येथे वैजयंता पाटील यांच्या बहिणीच्या घरी त्या काही वेळ थांबल्या. सर्वांनी मिळून एकत्र खिचडी खाल्ली. त्यानंतर ओढ्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन घरी जाणार, असे सांगून शीतल आणि वैजयंता पाटील मुलीसह बाहेर पडल्या.

देवदर्शनानंतर घरी जाताना शिवाजी विद्यापीठ चौकातून पुढे पोस्ट ऑफिसमोर पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने शीतल यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत वैजयंता पाटील आणि इशिता रस्त्यावर फेकल्या गेल्या, तर शीतल ट्रकच्या चाकाखाली सापडल्या. कंबरेखालील भागाला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव झाला. गंभीर जखमी अवस्थेतील शीतल यांना १०८ रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले, तर वैजयंता पाटील आणि इशिता यांना रिक्षाचालक जितेंद्र शिंदे यांनी त्यांच्या रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले.

उपचारादरम्यान शीतल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघाताची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली असून, पोलिसांनी ट्रकचालकास ताब्यात घेतले. हा ट्रक खत घेऊन कागलच्या दिशेने निघाला होता.

घटनास्थळी विदारक दृश्य

अपघातानंतर शीतल कवडे ट्रकखालीच विव्हळत पडल्या होत्या, तर तिची मुलगी इशिता आणि जखमी पाटील मदतीसाठी आरडाओरडा करीत होत्या. दुचाकीच्या डिकीतील खिचडी रस्त्यावर विखुरली होती. रिक्षाचालक जितेंद्र शिंदे यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून घेतली. त्यानंतर काही वाहनधारकांच्या मदतीने कवडे यांना रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये पाठवले.

सीपीआरमध्ये आक्रोश

अपघाताची माहिती मिळताच कवडे आणि पाटील कुटुंबीयांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. काही वेळातच शीतल कवडे यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच नातेवाइकांनी हंबरडा फोडला.

ट्रकचालकास अटक

शीतल कवडे यांच्या दुचाकीला (एमएच ०९ एफयू ६३८२) धडक देणारा ट्रक (एमएच ११ एएल २००३) राजारामपुरी पोलिसांनी ताब्यात घेतला असून, ट्रकचालक शकील इमाम पटेल (वय २९, रा. निमणी, ता. तासगाव, जि. सांगली) याला अटक केली.

Web Title: Woman killed in an accident on Shivaji University Road in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.