Kolhapur: म्हशीच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; आई, भाऊ जखमी
By उद्धव गोडसे | Published: March 19, 2024 12:58 PM2024-03-19T12:58:41+5:302024-03-19T12:59:53+5:30
रुग्णालयातून घरी परत जाताना घडली दुर्घटना
कोल्हापूर : रुग्णालयात उपचार घेऊन घरी परत जाताना कळंबा येथील घोडके मळ्याजवळ म्हशीने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार झाली, तर तिची आई आणि भाऊ जखमी झाले. ही दुर्घटना सोमवारी (दि. १८) रात्री अकराच्या सुमारास घडली.
आफ्रिन नदीम बुखारी (वय २९) असे मृत महिलेचे नाव आहे. जुबेर शमशुद्दीन काझी (वय २७) आणि फरझाना शमशुद्दीन काझी (वय ४५, तिघे रा. कात्यायनी पार्क, कळंबा, ता. करवीर) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहीण आफ्रीन हिच्यावर उपचार करण्यासाठी जुबेर हा बहीण आणि आईला घेऊन सोमवारी रात्री रुग्णालयात गेला होता. उपचारानंतर घरी परत जाताना घोडके मळ्याजवळ अचानक बाजूने आलेल्या म्हशीने जुबेर याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले. परिसरातील नागरिकांनी तातडीने जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करून काझी यांच्या नातेवाईकांना अपघाताची माहिती दिली.
डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आफ्रीन यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांची आई आणि भाऊ यांच्यावर उपचार सुरू आहेत. सीपीआरमध्ये उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.