माय देवासारखी धावली, आईसह बुडणाऱ्या दोन मुलींचे वाचवले प्राण; आजऱ्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 07:05 PM2022-05-02T19:05:26+5:302022-05-02T19:05:47+5:30
आजऱ्यातील हिरण्यकेशी नदीघाटावर आईसोबत दोन मुली बुडत होत्या. याचवेळी एक महिला देवासारखी धावून आली अन् तिने या बुडणाऱ्या माय लेकींचे जीव वाचवले.
आजरा : आजऱ्यातील हिरण्यकेशी नदीघाटावर आईसोबत दोन मुली बुडत होत्या. याचवेळी एक महिला देवासारखी धावून आली अन् तिने या बुडणाऱ्या माय लेकींचे जीव वाचवले. राजश्री डोंगरे असे या जीव वाचवणाऱ्या महिलेचे नाव आहे. राजश्री यांच्या या धाडसाबद्दल मराठा महासंघाच्यावतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला.
रविवारी (दि.१मे) वेळ सकाळी नऊच्या दरम्यानची. महिला धुणे धुण्यासाठी नदीघाटावर गेल्या होत्या. यावेळी प्रियांका पोवार ही महिलाही कपडे धुत होती. त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्या आर्या व पूजा या दोन मुलीही आल्या होत्या. नदीघाटावर या मुली खेळत असता कधी पाण्यात उतरल्या हे कोणाच्याही लक्षात आले नाही. प्रियांका पोवार यांच्या लक्षात येताच त्यांनी पाण्यातच उडी घेऊन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिघीही बुडू लागल्यानंतर आरडाओरड सुरू झाली.
याचवेळी प्रसंगावधान राखून व समय सूचकतेने राजश्री डोंगरे यांनी नऊवारी साडी पाण्यात भिजवून ती पोवार यांच्याकडे फेकली. अन् ती साडी धरण्यास सांगून बुडणाऱ्या या माय लेकीस बाहेर ओढण्यास सुरुवात केली. हे सुरु असताना घाबरलेल्या पूजाने आईची साडी धरली. मात्र सर्व महिलांनी हळुवारपणे दोन मुली व आईला सुखरुप बाहेर काढले. यानंतर राजश्री डोंगरे यांनी आई प्रियांका पोवार व मुली आर्या व पूजा यांना धीर दिला व घरी आणून सोडले.
राजश्री डोंगरे यांच्या या धाडसाने व समयसुचकतेमुळे माय लेकींचा जीव वाचला. यामुळे मराठा महासंघाच्या सुनंदा मोरे, भैरवी सावंत यांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, संभाजी इंजल, दत्तात्रय मोहिते, शिवाजी गुडूळकर, विष्णू सुपल, चंद्रकांत पारपोलकर, महादेव पोवार, प्रकाश देसाई यासह अनेक जण उपस्थित होते.