आई, घरी सोडतो म्हणत दिली लिफ्ट अन् केली दागिन्यांची लूट, दाम्पत्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 01:51 PM2021-12-08T13:51:40+5:302021-12-08T13:52:02+5:30
‘आई, तुम्हांला कोठे जायचे आहे, चला घरी सोडतो’ असे सांगितले. ‘आई’ म्हंटल्याने ते ओळखीचे असावेत असा समज करून कुंभार ह्या मोटारीत बसल्या अन तेथेच फसल्या.
कोल्हापूर : लिफ्ट देण्याच्या बहाण्याने मोटारीत बसवून ठार मारण्याची धमकी देऊन महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने लुटणाऱ्या साताऱ्यातील दाम्पत्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली. सलमान मुबारक खान तांबोळी (वय २९) व त्यांची पत्नी आयेशा तांबोळी (वय २४, दोघेही रा. शिवजल सिटी, नाईक बोमवाडी, ता. फलटण, जि. सातारा. मूळ गाव- भवानीनगर, विटा, ता. खानापूर, जि. सांगली) अशी लुटारू दांपत्याची नावे आहेत. त्यांच्याकडून लुटलेले सोन्याचे दागिने, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटारकार असा सुमारे ३ लाख ११ हजार ६५० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. अवघ्या २२ दिवसांत स्थानिक अन्वेषण पथकाने गुन्हा उघडकीस अणून लुटारूंना बेड्या ठोकल्या.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. १६ नोव्हेंबर रोजी पेरीड नाका, मलकापूर येथून मंगल ज्ञानदेव कुंभार (वय ५२, रा. कुंभार गल्ली, मलकापूर) या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने दांपत्याने आपल्या मोटारीत बसवले. पुढे दांपत्याने त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले. त्यांना जोतिबा मार्गावर केर्ली फाटा येथे रस्त्यात उतरवले.
शाहुवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला
घटनेनंतर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे निरीक्षक प्रमोद जाधव यांच्या पथकास, तांबोळी दांपत्याने ही लुटमार केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांना मणेरमळा येथे अटक केली. ‘खाक्या’ दाखवताच गुन्ह्याची कबुली दिली. लुटलेले दागिने, मोबाईल संचासह गुन्ह्यात वापरलेली मोटारकार असा सुमारे ३ लाख ११ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. संशयितास पुढील तपासासाठी शाहुवाडी पोलिसांकडे सुपुर्द केले.
सासुरवाडीत ठोकल्या बेड्या
संशयित लुटारू आरोपी तांबोळी दांपत्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ते आयेशाचे वडील व सलमानचे सासरे जमिर बाबासाहेब पठाण यांच्या मणेरमळा, उचगाव (ता. करवीर) येथील घरी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घरावर छापा टाकून लुटारूंना बेड्या ठोकल्या.
तपासाचे शिलेदार...
स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अंमलदार असिफ कलायगार, सुरेश पाटील, रामचंद्र तांबोळी, विनोद कांबळे, अनिल जाधव व वैशाली पाटील हे गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना त्यांना तांबोळी दांपत्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली व त्यानुसार त्यांना गजाआड केले.
आई, घरी सोडतो चला...
मंगल कुंभार ह्या मलकापूर येथे शेतातून येऊन पेरीड नाका परिसरात रस्त्याकडेला थांबल्या. त्याचवेळी तेथे तांबोळी दांपत्य मोटारकार घेऊन आले. त्यांनी, ‘आई, तुम्हांला कोठे जायचे आहे, चला घरी सोडतो’ असे सांगितले. ‘आई’ म्हंटल्याने ते ओळखीचे असावेत असा समज करून कुंभार ह्या मोटारीत बसल्या अन तेथेच फसल्या.