महिलेला दुर्मीळ रक्तगटाचे रक्त देणारा ‘तो’ देवदूत केव्हाचा जन्मला होता...
By admin | Published: April 5, 2017 11:33 PM2017-04-05T23:33:54+5:302017-04-05T23:33:54+5:30
महिलेला दुर्मीळ रक्तगटाचे रक्त देणारा ‘तो’ देवदूत केव्हाचा जन्मला होता...
विहार तेंडुलकर ल्ल रत्नागिरी
रक्तासाठी जिल्हा रुग्णालयात बेडवर मृत्यूशी झुंज देणारी अंजली हेळकर ही चिरेखाणीवर काम करणारी महिला आणि तिचा जीव वाचावा, यासाठी डॉक्टरांची चाललेली धावाधाव... रक्तदात्यांची डायरी, त्यांची माहिती मिळवण्याचे आटोकाट प्रयत्न आणि कितीतरी वेळानंतर एक आशेचा किरण दिसला, तासगाव सांगलीच्या विक्रम यादवच्या रुपाने! यादव यांनीही तत्काळ रक्त देण्यास होकार दर्शवला, एवढेच नव्हे तर पुढच्या काही तासातच ते रक्त देण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले. खरंतर बॉम्बे या दुर्मीळ रक्तगटाचा दाता सापडेल की नाही, अशीच शंका होती. त्यामुळे ज्यावेळी यादव यांच्या रुपाने देवदूतच धावल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. रत्नागिरीला हा देवदूत कदाचित काल-परवा माहीत झाला असेल, पण अनेकांचे प्राण वाचवणारा हा देवदूत केव्हाचाच जन्मला आहे.
विक्रम यादव, तासगाव येथील चितळे डेअरीवर एक सामान्य वाहनचालक...! पण, एखाद्या उच्चशिक्षितालाही लाजवेल, असं भान असणारा माणूस! दहा वर्षांपूर्वी त्याने रक्ताने तडफडणाऱ्या माणसांसाठी एक चळवळ उभारली, रक्तदात्यांना एकत्र आणण्यास सुरुवात केली. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना त्यांनी ‘रक्ताने’ जवळ आणले. पण, त्यांची महत्त्वाकांक्षा आभाळाएवढी होती. यादरम्यान, दुर्मीळ ‘बॉम्बे’ रक्तगटही आला आणि विक्रम यादव यांनी या रक्तगटाच्या रक्तदात्यांचाही शोध घेणे सुरु केले.
रक्ताची गरज भासणाऱ्या रूग्णांसाठी त्यांनी रक्तदान शिबिरे भरवण्यास सुरुवात केली. विविध ठिकाणी अशी शिबिरे भरवल्यानंतर या शिबिरातूनच त्यांना ‘बॉम्बे’ या दुर्मीळ रक्तगटाचे रक्तदातेही सापडले. विशेष म्हणजे केंद्र शासनाच्या दप्तरी देशभरातील बॉम्बे रक्तगटाच्या केवळ १७९ रक्तदात्यांची नोंद आहे. मात्र, रक्तदान शिबिरामुळे यादव यांना आतापर्यंत या रक्तगटाच्या २३० रक्तदात्यांचा शोध लागला आहे. यादव हे केवळ एक रक्तदाते म्हणून समाजात काम करत नाहीत, तर ते प्रत्येक अडीनडीला स्वखर्चाने धावून जातात. रक्ताचा पैसा न करणारा हा महामानव वाहनचालक म्हणून मिळणाऱ्या पैशांवरच गुजराण करतो आणि मोफत रक्त पुरवतो.
यादव यांनी बॉम्बे रक्तदात्यांसाठी संघटनाही स्थापन केली आहे, बॉम्बे ब्लड ग्रुप आॅर्गनायझर, महाराष्ट्र असे या संघटनेचे नाव! या संघटनेला आता तीन वर्षे झाली. यादव यांनी स्वत: ४२ जणांना रक्त पुरवले आहे.
मित्राच्या मृत्यूतून इर्षा निर्माण झाली
१९९४ साली आपल्या एका मित्राचा रक्ताअभावी मृत्यू झाला. त्यावेळीच मनाशी ठरवले होते की, रक्ताअभावी आपल्या डोळ्यादेखत तरी कोणाचा मृत्यू होता कामा नये. तेव्हापासून या कार्यात आपण पुढाकार घेतला, असे यादव यांनी सांगितले.
आर्थिक मदतीसाठीही पुढाकार
केवळ रक्तामुळेच नव्हे; तर आर्थिक मदतीअभावी एखाद्या रुग्णाचा प्राण जात असेल तर त्यांच्याशी संपर्कात असलेल्या १५ हजार ७३० लोकांकडून ते प्रत्येकी १० रुपये घेतात आणि १ लाख ५७ हजार ३०० रुपयांची मदत रुग्णाकडे सुपूर्द करतात.
देशव्यापी रक्तमोहीम
अंगातील बळ आणि डोक्यातील हुशारी वेळीच ओळखली तर सामान्य माणसाच्या दंडात किती ताकद असते, याची चुणूक विक्रम यादव यांनी दाखवून दिली आहे. त्यांनी व्हॉट्सअॅपवर १२ ग्रुप तयार केले आहेत. राज्यस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातील रक्तदात्यांना त्यांनी व्हॉट्सअॅपव्दारे एकत्र आणले आहे. १२ राज्यात कोठेही रक्ताची गरज भासली तरीही यादव रक्ताची सोय करू शकतात. १५ हजार ७३० रक्तदात्यांची त्यांच्याकडे यादी आहे.
१९९४नंतर माझ्या एका मित्राचा रक्ताअभावीच मृत्यू झाला. त्यावेळी मला कळलं की, माझा रक्तगट बॉम्बे असून, तो दुर्मीळ आहे. मला डॉक्टरनी सांगितलं की, ज्यावेळी तुम्हाला रक्त लागेल, त्यावेळी या रक्तगटाची सोय कशी करणार? हा रक्तगट तर दुर्मीळ आहे! त्यामुळेच मी या रक्तदात्यांना एकत्र आणलं. आज आमच्या संपर्कात बॉम्बे पॉझिटिव्ह २३०, तर निगेटिव्ह गटाचे ३ रक्तदाते आहेत.
-विक्रम यादव