फरशीवर आपटून फिरस्त्या महिलेचा खून
By admin | Published: September 23, 2014 12:44 AM2014-09-23T00:44:30+5:302014-09-23T00:47:13+5:30
संशयित ताब्यात : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील घटना
कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंडा ओळ येथील श्री सेल्स दुकानगाळ्याच्या समोरील पायरीवर झोपलेल्या फिरस्त्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. वहिदा इस्माईल चोचे ऊर्फ महात (वय ५०, रा. भोई गल्ली, रविवार पेठ, मूळ गाव फेजीवडे, ता. राधानगरी) असे तिचे नाव आहे.
याप्रकरणी तिच्या नेहमी सहवासात असणारा संशयित कृष्णात बाळू म्हाळुंगेकर (वय ५२, रा. ठिकपुर्ली, ता. राधानगरी) यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. हा खून वैयक्तिक कारणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले, लक्ष्मीपुरी कोेंडा ओळ येथील श्री सेल्स दुकानासमोर रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह पडलेला नागरिकांना दिसला. या प्रकाराची माहिती त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह पाहिला असता तोंडाला गंभीर जखम झाल्याचे दिसून आले. मारेकऱ्याने केस पाठीमागे पकडून फरशीवर तोंड आपटून खून केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. रविवारी रात्री दुकानासमोरील पायऱ्यांवर पोते पांघरून ती झोपली होती. शेजारी तिने चप्पलाही काढल्या होत्या. तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र व कानात रिंगा होत्या. त्याला मारेकऱ्याने हात लावला नव्हता. पोलिसांनी आजूबाजूच्या सिक्युरिटी गार्ड व नागरिकांकडे चौकशी केली तसेच तिच्या नेहमी सहवासात असणारा संशयीत कृष्णात म्हाळुंगेकर याला चौकशीसाठी पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल, शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केले. यावेळी श्वान पथकाद्वारे मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते परिसरातच घुटमळले. (प्रतिनिधी)
सुशिक्षित घराण्यातील महिला
वहिदा महात हिचे भोई गल्लीमध्ये घर आहे. त्या ठिकाणी तिचे भाऊ राहतात. तिचा पती राधानगरी येथे आहे. एक मुलगा पनवेलला, तर विवाहित दोन मुली सातारा व मुक्त सैनिक वसाहतीमध्ये राहतात. गेल्या सात वर्षांपासून ती घराबाहेर पडली होती. भीक मागून मिळेल त्या जागी झोपणे असा तिचा दिनक्रम होता. लक्ष्मीपुरी कोंडा ओळ परिसरातच फिरत असायची.
गेल्या काही वर्षांपासून तिच्यासोबत कृष्णात म्हाळुंगेकर हा फिरत होता. तो परिसरातीलच एका दुकानात हमालाचे काम करत असे. त्यांच्यात मोठमोठ्याने वादावादीचे प्रकारही होत असत. रात्रीच्या वेळी ती मोठमोठ्याने शिवीगाळ करताना नागरिकांना दिसे. काहीवेळा तिची मुलगी व जावई तिला खर्चासाठी पैसे देऊन जात असत. आज सकाळी तिचा खून झाल्याचे समजताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
‘सीरियल किलर’ची आठवण
महिलेचा खून झाल्याचे वृत्त शहरभर पसरताच पुन्हा सीरियल किलर अवतरला की काय, अशी भीती नागरिकांना वाटू लागली. यापूर्वी सीरियल किलरने फिरस्त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केले होते. हा खूनही तसाच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत होते. हा खून सीरियल किलरने केला आहे का, अशी चौकशीही काही नागरिकांनी पोलिसांच्याकडे केली.