पोकलॅनच्या बकेटमध्ये अडकून महिलेचे तुटले शीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:22 AM2021-04-19T04:22:49+5:302021-04-19T04:22:49+5:30
कोल्हापूर : कचऱ्याचे विलगीकरण करताना पोकलॅनच्या बकेटचा दात मानेत घुसून स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेचे शीर धडावेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी ...
कोल्हापूर : कचऱ्याचे विलगीकरण करताना पोकलॅनच्या बकेटचा दात मानेत घुसून स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेचे शीर धडावेगळे झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सकाळी कसबा बावडा येथील झुम प्रकल्पावर घडली. यामुळे प्रकल्पावर खळबळ माजली. घटनास्थळी महिलेचे धड मिळाले, पण शीर तुटून बकेटमधून कचऱ्याबरोबर ढिगाऱ्यात गायब झाल्याने सुमारे तीन तासांच्या अथक शोधकामानंतर ते कचऱ्यातच सापडले. मंगल राजेंद्र दावणे (वय ६० रा. तिरंगा चौक, आठ नंबर शाळेनजीक, शिवाजी पेठ, कोल्हापूर) असे त्या ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
कसबा बावडा येथील झुम कचरा प्रकल्पावर संपूर्ण शहरातील कचरा टाकला जातो. येथे घनकचरा प्रक्रिया केंद्रानजीक डंपिंग ग्राऊंडवर रोज किमान २० ते २५ महिला स्क्रॅप शोधत असतात. रविवारी सकाळी इतर महिला मोठ्या ढिगाऱ्यानजीक स्क्रॅप शोधत होत्या, शेजारी डंपिंग ग्राऊंडवर कचर्याच्या ढिगांमागे खड्ड्यात मंगल दावणे ह्या एकट्याच स्क्रॅप शोधत होत्या. पोकलॅन चालकाला ढिगाऱ्यामागे अंदाज न आल्याने त्याने तेथे बकेट घालून कचरा उचलला, बकेटचे दात स्क्रॅप शोधणाऱ्या महिलेच्या मानेत घुसून शीर तुटून धडावेगळे झाले. धड खड्ड्यातच राहिले तर बकेटद्वारे शीर कचऱ्यासह ढिगाऱ्यात टाकले. काहीवेळाने हा प्रकार चालकाच्या लक्षात आला. त्याला कचऱ्याच्या खड्ड्यात महिलेचे फक्त धडच दिसले. परिसरात स्क्रॅप शोधणाऱ्या महिलांनी तातडीने तेथे धाव घेतली.
माहिती मिळताच महापालिकेचे आरोग्य मुख्याधिकारी जयवंत पोवार, आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर, अग्निशमन दलाचे कर्मचारी, शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक स्मिता पाटील घटनास्थळी आले. पोलिसांनी पोकलॅनवरील दोघा चालकांना ताब्यात घेतले आहे.
तीन तासांनी सापडले शीर
घटनास्थळी महिलेचे फक्त धडच पोलिसांना मिळाले. दोन पोकलॅन मशीनद्वारे पुन्हा सुमारे तास अथक कचऱ्याचा ढीग उपसल्यानंतर मृत महिलेचे शीर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडले.
बकेट रक्तांनी माखले
पोकलॅनद्वारे चालकाला बकेट भरून कचरा ढिगाऱ्यावर टाकताना बकेटचा दात रक्ताने माखल्याचे दिसले, चालक बिथरला. त्याने काम थांबवून कचऱ्याच्या खड्ड्यात पाहिले, तेथे शीरविना फक्त महिलेचे धड तळमळताना दिसले.
कुटुंबाचा आधार संपला...
मंगल दावणे ह्या कुटुंबप्रमुख होत्या. गेली २५ वर्षे कचऱ्यातून स्क्रॅप गोळा करून संसाराचा गाडा चालवत होत्या. त्यांना मुलगा, मुलगी, सून, नातवंड असा परिवार आहे. त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबाचा आधार हरपला. त्यांचा मुलगा प्रकाश सेंट्रिंग कामावर होता. तेथे त्याला घटना सांगितल्याने त्याने घटनास्थळी धाव घेतली.
महिलांना प्रतिबंध... आंदोलन
झुम कचऱ्याच्या ठिकाणी कचऱ्यातून स्क्रॅप शोधून त्या विक्री करून कुटुंब चालविणाऱ्या सुमारे २० ते २५ महिला आहेत. त्यांच्याबाबत आयुक्ताक़डे वारंवार तक्रारी केल्या, पण त्या महिलांनी पुन्हा आंदोलन करून स्कॅप शोधकाम सुरूच ठेवतात, अशी माहिती आरोग्य निरीक्षक निखिल पाडळकर यांनी सांगितली.