‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा
By admin | Published: January 24, 2017 12:15 AM2017-01-24T00:15:35+5:302017-01-24T00:15:35+5:30
जयकुमारांच्या पीएची फिर्याद : विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण शक्य
सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली. प्रदीप जाधव (दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि सातारा येथील महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाल्याने आमदार गोरेंवर दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.
आमदार जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविणे हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात येऊन अटकही झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आमदार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांनी प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि सातारा येथील एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली.
अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत शेखर गोरे यांचा पराभव झाला. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा धुळीस मिळाले. त्यामुळे विरोधक आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी माझ्याशी संपूर्ण साधून व दहिवडी येथे समक्ष भेटून तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक द्या. रक्कम न दिल्यास आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असे सांगितले.