कोल्हापूरमध्ये भाजपअंतर्गत संघर्ष उफाळला, महिला कार्यकर्त्यांनी महेश जाधवांविरोधात दिलं निवेदन
By समीर देशपांडे | Published: September 23, 2022 05:58 PM2022-09-23T17:58:59+5:302022-09-23T18:08:49+5:30
‘आपला शिस्तबध्द पक्ष आहे. असे जाहीर निवेदन देणे योग्य नाही.
कोल्हापूर : गेले अनेक महिने धुमसत असलेल्या भाजप अंतर्गत कलहाला अखेर, आज शुक्रवारी तोंड फुटले आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून भाजपच्या अनेक महिला कार्यकर्त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव यांच्याविरोधात लेखी निवेदनच दिले.
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये प्रवक्ते माधव भंडारी यांचे व्याख्यान होते. हा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंत्री पाटील हे दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघाले असताना २०/२५ महिलांनी पाटील यांच्या गाडीजवळ जावून त्यांना महेश जाधव यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून निवेदन दिले. यावेळी अन्य कार्यकर्तेही या ठिकाणी उपस्थित होते.
यावर पाटील यांनी, ‘आपला शिस्तबध्द पक्ष आहे. असे जाहीर निवेदन देणे योग्य नाही. घरात भांडणे होतात की नाही. मला सगळे माहिती आहे. मी आल्यानंतर चार दिवसात बसून बोलू’ असे सांगितले. यानंतर भाजपच्या विजयाच्या घोषणा देत कार्यकर्ते नाट्यगृहामध्ये भंडारी यांच्या व्याख्यानासाठी आले. भाजपमधील मतभेदांचे जाहीर प्रदर्शन चर्चेचा विषय झाले आहे.