Kolhapur: महिलांकडून फायनान्स कर्मचाऱ्यांना चोप, फायनान्सच्या पाचजणांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 04:46 PM2024-05-04T16:46:09+5:302024-05-04T16:48:19+5:30
इचलकरंजी : दत्तनगर-कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका महिला बचत गटाकडील थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या ...
इचलकरंजी : दत्तनगर-कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका महिला बचत गटाकडील थकीत हप्त्याच्या वसुलीसाठी रात्रीच्या सुमारास आलेल्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांची भागातील महिलांनी धुलाई केली. याप्रकरणी रेश्मा अर्शद मणेर (रा. दत्तनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचजणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कृष्णा रवी शिंदे, उद्धप्पा मारुती मुदगलवार, प्रवीण पुंडलिक जाधव (तिघे रा. निपाणी-कर्नाटक), जावेद अजहर मकानदार व परवीन अल्लाउद्दीन हैदर (दोघे रा. कबनूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या फायनान्स कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अधिक माहिती अशी: भारत फायनान्स कंपनीचे काही कर्मचारी कबनूर येथील दत्तनगर परिसरात बचत गटाचा एक हप्ता थकल्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून बचत गटातील महिलांच्या दारात जाऊन वसुलीचा तगादा लावत होते. गुरुवारी (दि.२) सकाळपासून रात्रीपर्यंत वसुलीसाठी महिलांच्या दारात थांबत होते. याबाबत काही महिलांनी दिव्या मगदूम यांना माहिती दिली.
त्या घटनास्थळी आल्या आणि फायनान्स कर्मचाऱ्यांकडे विचारणा करत असताना त्या कर्मचारी व दोन महिलांनी उद्धटपणे उत्तरे दिली. त्यामुळे मगदूम यांच्या समर्थक महिलांनी त्या कर्मचाऱ्यांची धुलाई केली. या घटनेने दत्तनगर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कर्मचाऱ्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.