महिला बालविकास अधिकारी महाडिक रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 04:58 PM2020-09-03T16:58:06+5:302020-09-03T17:01:30+5:30
कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक रजेवर गेल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी म्हणणे दिले असले तरी साडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच त्या रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकारी निवेदिता महाडिक रजेवर गेल्या आहेत. या महिनाअखेरपर्यंत वैद्यकीय रजेवर असल्याचे त्यांनी म्हणणे दिले असले तरी साडी खरेदी प्रकरणी चौकशीचे आदेश प्राप्त होताच त्या रजेवर गेल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
साहाय्यक आयुक्त कार्यालयाकडूनच त्यांच्याकडील पदभार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान, महाडिक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला: पण होऊ शकला नाही.
या संदर्भात साहाय्यक आयुक्त नितीन मस्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी रजा मंजूर केली असल्याचे सांगून कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिल्याचे सांगितले. साडी प्रकरणाची चौकशी सुरू असल्याच्या माहितीला दुजोरा दिला.
जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नितीन मस्के यांची जुलैमध्ये पुण्याला साहाय्यक आयुक्त म्हणून बदली झाली. या पदाचा अतिरिक्त कार्यभार महाडिक यांच्याकडे देण्यात आला होता. तोदेखील त्यांनी स्वीकारला नाही. साडी खरेदी प्रकरणी आयुक्त कार्यालयाकडून नुकतेच चौकशीचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून हे पत्र हातात मिळाल्यावर लगेचच त्यांनी वैद्यकीय रजा टाकून पुण्याला जाण्याचा मार्ग निवडला. २४ ऑगस्ट ते ३० सप्टेबरपर्यंत अशी वैद्यकीय रजा मंजूर करून घेतली आहे. त्यांचा कार्यभार करवीरच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांच्याकडे देण्यात आला.
पण हा कार्यभारही बदलून जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ रसाळ यांच्याकडे देण्यात आला. रसाळ यांच्याकडे आधीच सात कामांचा अतिरिक्त कार्यभार आहे. कोविड ड्यूटीचे महत्त्वाचे काम त्यांच्याकडे आहे.
नेमके काय प्रकरण..
महाडिक यांनी वर्षभरापूर्वी कोल्हापूर शहर महिला बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा कार्यभार घेतला. अंगणवाडी कर्मचारी साडी वाटप, शालेय पोषण आहार वाटप यावरून संघटनासोबत त्यांचे खटके उडाले होते. हलक्या दर्जाच्या साड्या जास्त किमतीने खरेदी करून त्या अंगणवाडी सेविकांच्या माथी मारल्याची तक्रार आहे. त्याच्या चौकशीची मागणी अंगणवाडी कर्मचारी युनियनने जिल्हा परिषदेकडे केली होती.