महापालिका शिक्षक पुरस्कारात महिलांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 02:41 PM2019-09-05T14:41:06+5:302019-09-05T14:43:53+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श सेवक’ पुरस्कार बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे पुरस्कारप्राप्त १२ शिक्षकांमध्ये सात महिला शिक्षकांचा समावेश आहे. पुरस्काराच्या यादीतही महिलांनी बाजी मारली आहे.
महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत प्रत्येक वर्षी महापालिका शाळेतील, तसेच खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. त्याची घोषणा शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. सन २०१९-२० सालातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी बुधवारी सायंकाळी शिक्षण समिती सभापती श्रावण फडतारे व प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी जाहीर केली.
महापालिका शाळेतील स्मिता कारेकर, सुरेश केरुरे, द्रोणाचार्य पाटील, कल्पना काटकर, शांतादेवी कोळेकर या शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक’ तर जयेंद्र चव्हाण यांना ‘विशेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
खासगी प्राथमिक शाळेतील गोरख वातकर, सीमा कुलकर्णी, नंदीनी कोंडेकर, छाया हिरुगडे, अनिल खोत यांना ‘आदर्श शिक्षक’ तर सविता गिरी यांना ‘विशेष पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याशिवाय श्रीकांत शिंदे व दशरत पाटील यांना ‘आदर्श सेवक’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
पुरस्कारप्राप्त शिक्षकांची निवड करण्याकरिता अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्राचार्य आय. सी. शेख, प्रा. प्रभाकर हेरवाडे, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांची समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीने प्राप्त अर्जांची छाननी करून अंतिम निवड संबंधित शिक्षकांची मुलाखत घेऊन केली. लवकरच विशेष समारंभात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक -
- महापालिका प्राथमिक शाळा
१. स्मिता समीर कारेकर, सहायक शिक्षिका-ल. कृ. जरग विद्यालय.
२. सुरेश आप्पा करुरे, सहायक शिक्षक-गोविंद पानसरे विद्यालय.
३. जयेंद्र गणपतराव चव्हाण, कला शिक्षक-शिवाजी विद्यालय, जाधववाडी
४. द्रोणाचार्य विष्णू पाटील, सहा. शिक्षक-वि. स. खांडेकर विद्यामंदिर
५. श्रीमती कल्पना विनायक काटकर, सहा. शिक्षिका-टाकाळा विद्यामंदिर
६. श्रीमती शांतादेवी कृष्णा कोळेकर, सहा. शिक्षिका-हिंद विद्यामंदिर
- खासगी प्राथमिक शाळा -
१. गोरख पांडुरंग वातकर, सहा. शिक्षक-जीवन कल्याण विद्यालय
२. सीमा प्रदीप कुलकर्णी, सहा. शिक्षिका-शेलाजी वन्नाची विद्यालय
३. नंदिनी हिंदुराव कोंडेकर, प्रभारी मुख्याद्यापिका-शाहू दयानंद मराठी शाळा
४. छाया रघुनाथ हिरुगडे, मुख्याद्यापिका-यशवंतराव भाऊराव पाटील, विद्यालय
५. सविता भालचंद्र गिरी, सहा शिक्षिका-सरस्वती चुनेकर विद्यामंदिर
६. अनिल शंकर खोत, सहा. शिक्षक-विद्यामंदिर, शाहूपुरी
आदर्श सेवक पुरस्कार -
१. श्रीकांत ना. शिंदे, वीर कक्कया विद्यामंदिर
२. दशरथ पाटील, संत रोहिदास विद्यामंदिर