परसबागेतून ५० लाखांचे उत्पन्न महिलांनी घेतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:36 AM2020-12-14T04:36:26+5:302020-12-14T04:36:26+5:30
शिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातून (उमेद)च्या माध्यमातून जिल्ह्यात ४२२५ परसबाग फुलल्या असून, या पसरबागेतून ५० लाखांचे उत्पन्न ...
शिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातून (उमेद)च्या माध्यमातून जिल्ह्यात ४२२५ परसबाग फुलल्या असून, या पसरबागेतून ५० लाखांचे उत्पन्न महिलांनी घेतले आहे.
महिलांना चांगला व सेंद्रिय भाजीपाला मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातून (उमेद)च्या माध्यमातून चालू वर्षी बचतगट, वैयक्तिक आणि तालुकास्तरीय असे तीन विभागात परसबाग उपक्रमाची सुरुवात झाली होती.
यासाठी ‘उमेद’ने ही कोरोनाच्या काळातही पसरबागेची संकल्पना महत्त्व महिलांना सांगितले.
जून महिन्यात जिल्ह्यात परसबाग उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येक तालुक्यात एक अशी १२ प्रदर्शनीय परसबाग उभारली. त्यानंतर ३८०० वैयक्तिक परसबागा महिलांनी उभारल्या, तसेच बचतगट महिलांनी ४१५ परसबागा उभा केल्या.
परसबागेतून सेंद्रिय पद्धतीने शेती आणि भाजीपाला पिकविण्यासाठी प्रशिक्षण घेतले.
ग्रामसंघातील महिलांसह गरोदर स्त्रिया, स्तनदा माता,
लहान मुले, किशोरवयीन मुलींना विषमुक्त, ताजा व पोषण तत्त्वांनी युक्त भाजीपाला नियमित उपलब्ध व्हावा यासाठी ही संकल्पना शासनाने राबविली आहे.
या परसबागेत मेथी, पोकळा, शेपू, चुका, आळू, कोथिंबीर, अंबाडी, वांगी, टोमेटो, शेवगा, लिंबू, भेडीं, गवार, दोडका, कारली,घेवडा, कडीपत्ता, औषधी वनस्पती गौती चहा, तुळस, कोरफड, अश्वगंधा, शतावरी, अडुळसा, पपई, लिंबू यासारख्या भाजीपाला फळझाडे लावून उत्पादन घेतले आहे. या ठिकाणी तयार होणारा भाजीपाला पूर्णपणे सेंद्रिय असणार आहे आणि तो पोषक आहे.
बागेसाठी आवश्यक गांडूळ खत, कंपोस्ट खत,
दशपर्णी व जीवनामृत उभारले. या भाजीपाल्यामधून महिलांना स्थानिक बाजारपेठही उपलब्ध झाली आहे आणि महिलांनी उद्योग, व्यवसाय उभा करावेत, स्वत:च्या पायावर उभा राहावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हा त्यामागील उद्देश आहे. यातून प्रत्येक परसबागेतून स्वच्छ आणि सेंद्रिय भाजीपाला महिलांना मिळाला. स्वतः हा घरी खाऊन उर्वरित भाजीपाल्याची विक्री महिलांनी केली आहे. सर्व परसबागेतून सुमारे ५० लाखांचे उत्पन्न महिलांनी घेतले आहे.
या प्रकल्पासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, प्रकल्प संचालक जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष डाॅ. रवी शिवदास, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन पानारी यांचे सहकार्य लाभले.
प्रतिक्रिया :
जिल्ह्यात ४२२५ परसबाग फुलल्या असून, या परसबागेतून ५० लाखांचे उत्पन्न महिलांनी घेतले आहे. महिलांनी चांगला व सेंद्रिय भाजीपाला पिकविला आहे.
(प्रकल्प संचालक जिल्हा अभियान व्यवस्थापक कक्ष. डाॅ. रवी शिवदास)
फोटो ओळी :
महिला ग्रामसंघानी परसबाग बागेत सेंद्रिय भाजीपाला पिकविला आहे. (संग्रहित छायाचित्र)