महिलांनी पारंपरिक खेळातून अनुभवले बालपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 11:51 AM2020-01-28T11:51:18+5:302020-01-28T11:52:56+5:30
शिवाजी पेठेतील पद्माराजे संवर्धन समितीच्यावतीने महिलांनी पद्माराजे उद्यान परिसरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. काळाच्या ओघात लोप पावत चाललेले हे खेळ या महिलांनी खेळून आपले बालपण अनुभवले. दहा वर्षांच्या मुलींपासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंतच्या महिलांनी या अनोख्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे संवर्धन समितीच्यावतीने महिलांनी पद्माराजे उद्यान परिसरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध पारंपरिक खेळांचे आयोजन केले होते. काळाच्या ओघात लोप पावत चाललेले हे खेळ या महिलांनी खेळून आपले बालपण अनुभवले. दहा वर्षांच्या मुलींपासून ते ८० वर्षांच्या आजीपर्यंतच्या महिलांनी या अनोख्या उपक्रमात उत्साहाने सहभाग घेतला.
प्रारंभी समितीच्या कार्यकर्त्या सरिता सासने यांनी उपस्थित महिलांना संविधानाची शपथ दिली. यानंतर त्यांनी प्रापंचिक व्यापातून महिलांना आपले लहानपणीचे पारंपरिक खेळ खेळून विरंगुळा मिळावा, तसेच नव्या पिढीला पारंपरिक खेळ अवगत व्हावेत, यासाठी हा उपक्रम राबविल्याची माहिती दिली.
सहभागी महिलांनी दोरी उड्या मारणे, बिटया, काचा -कवडया, जिबलीने खेळणे, लगोरी, रस्सीखेच, असे खेळ खेळून मनमुराद आनंद लुटला. काही महिलांनी तर हालगीच्या तालावर लेझीमचा ठेका धरला.
ज्येष्ठ महिलांनी विनोदी किस्से सांगत, गाणी गात,भन्नाट उखाणेही घेत वाहवा मिळविली. सहभागी महिलांनी बालपणाला उजाळा मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत संयोजकांचे आभार मानले.
या उपक्रमात स्मिता हराळे, आरती वाळके, शोभा पाटील, गीता डाकवे, सरीता सासने, राजनंदा चौगले, आशा पाटील, शकुंतला सरनाईक, ऐश्वर्या सरनाईक, आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.