कोल्हापूर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय महिलाही सरसावल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 14:22 IST2025-02-12T14:21:39+5:302025-02-12T14:22:13+5:30

शिवाजी पेठेत मेळावा : लढा यशस्वी करण्याचा निर्धार

Women from all parties also came forward for Kolhapur boundary extension | कोल्हापूर हद्दवाढीसाठी सर्वपक्षीय महिलाही सरसावल्या

छाया-आदित्य वेल्हाळ

कोल्हापूर : एखाद्या लढ्यात महिला सहभागी होतात, तेव्हा तो यशस्वी होतो असा अनुभव आहे. आपण साऱ्याजणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे म्हणून सुरू असलेल्या लढ्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन हा लढा यशस्वी करूया, असा निर्धार मंगळवारी शिवाजी पेठेत झालेल्या सर्वपक्षीय महिला पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला.

शिवाजी तरुण मंडळाच्या कार्यालयात हा मेळावा पार पडला. यावेळी विविध राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या, माजी नगरसेविका, माजी महापौर सहभागी झाल्या होत्या. कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणे आवश्यक असल्याने या लढ्यात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले.

प्रारंभी भाजपच्या गायत्री राऊत यांनी शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न काय आहे, तो कधीपासून चर्चेत आहे, राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे, सरकारने त्याला कशी बगल दिली आहे यासंबंधीचा ऊहापोह केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्या जयश्री जाधव यांनी, शहराची हद्दवाढ झाली नसल्याने शहराचा विकास करण्यावर मर्यादा आल्याचे सांगितले.

माजी महापौर सई खराडे यांनी हद्दवाढीचा प्रश्न अनेक वर्षे सुटलेला नाही. २००६ मध्ये हद्दवाढ झाली असती. परंतु त्यावेळी काही जणांनी खो घातला. शहरात येणाऱ्या ग्रामीण जनतेवर महापालिकेने पुढील काही वर्षे प्राॅपर्टी टॅक्स लावायचा नाही, असेही ठरले होते, असे खराडे म्हणाल्या.

महिला कार्यकर्त्यांनी या लढ्यात भाग घेतला पाहिजे, असे आवाहन माजी महापौर हसिना फरास यांनी केले. महिला एकत्र येतात तेव्हा लढा यशस्वी होतो, तेव्हा हद्दवाढीचा लढा यशस्वी करूया, असे माजी महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या.

विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी वैशाली महाडिक, सिद्धी रांगणेकर, संगीता खाडे यांचीही भाषणे झाली. झहिदा मुजावर, माधुरी नकाते, माधवी गवंडी, श्वेता कुलकर्णी, रेखा आवळे, धनश्री तोडकर, पूजा भोर, मंगलताई साळोखे उपस्थित होत्या.

राजकीय इच्छाशक्तीचा अभाव

राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हद्दवाढीचा प्रश्न रेंगाळला आहे. म्हणूनच आता नेते मंडळींना हद्दवाढ का नको ते सांगा अशी विचारणा करण्याची वेळ आली असल्याचे पद्मजा तिवले यांनी सांगितले.

Web Title: Women from all parties also came forward for Kolhapur boundary extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.