‘मायक्रो फायनान्स’कडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:03 PM2019-11-27T12:03:10+5:302019-11-27T12:04:04+5:30
‘मायक्रो फायनान्सची सक्ती थांबलीच पाहिजे’, ‘बॅँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत’, ‘मुख्यमंत्री होऊन फायदा काय?, मंगळसूत्र विकते माझी माय, असे फलक मोर्चात झळकत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कर्जमाफी मिळावी, निर्वाह भत्ता मिळावा, अनुदान मिळावे, मागतो आम्ही हक्काचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कोल्हापूर : मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून तसेच बँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे सरसकट माफ करावीत, सरकारी योजना व महिलांसाठी विनातारण कर्जसुविधा उपलब्ध कराव्यात; यासाठी सर्व बँकांना आदेश द्यावेत. यासह विविध मागण्यांसाठी इचलकरंजीच्या छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली.
दुपारी एकच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. व्हिनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा आला. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ‘मायक्रो फायनान्सची सक्ती थांबलीच पाहिजे’, ‘बॅँकांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत’, ‘मुख्यमंत्री होऊन फायदा काय?, मंगळसूत्र विकते माझी माय, असे फलक मोर्चात झळकत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर कर्जमाफी मिळावी, निर्वाह भत्ता मिळावा, अनुदान मिळावे, मागतो आम्ही हक्काचे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महापुरानंतर पूरग्रस्त कुटुंबांची अवस्था अतिशय दयनीय आहे. अनेकांचे कुटुंबे उद्ध्वस्त झालीत. त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले; त्यामुळे शेतमजुरांचे हाल झाले. त्यांचा रोजगार गेला. उत्पन्नाचे साधन नसल्यामुळे अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली. यातून मार्ग काढत जगण्यासाठी अनेक महिलांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतले. या कर्जासाठी मायक्रोफायनान्स कंपन्या व बँका सक्तीचा तगादा लावत आहेत; त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून, पूरग्रस्त भागातील कुटुंबांना कर्जमाफी द्यावी. सरकारी योजनांमधून विनातारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. पूरग्रस्त भागाचे फेर पंचनामे करावे व योग्य लाभार्थींना त्वरित मदत द्यावी. अंशत: पडलेल्या घरांना दुरुस्तीसाठी ५0 हजार रुपये व पूर्णपणे पडलेल्या घरांना बांधणीसाठी तीन लाख रुपये त्वरित द्यावे. शेतमजुरी करणाऱ्या महिलांना निर्वाहभत्ता द्यावा. आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात अध्यक्षा दिव्या मगदूम, स्वाती माजगावे, पूनम कांबळे, अलमास तांबोळी, मनीषा कुंभार, सुनीता चौरसिया, बिस्मिल्ला दानवाडे, अमोल कुंभार, सुनील पाटील, संतोष पाटील, अकबर सनदी, आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.
===============================================================
फोटो : २६११२०१९-कोल-महिला मोर्चा
फोटो ओळी : मायक्रोफायनान्स कंपन्यांकडून महिलांनी घेतलेली कर्जे माफ करावीत, यासह विविध मागण्यांसाठी मंगळवारी छत्रपती शासन महिला आघाडीतर्फे कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून निदर्शने केली.
========================================
(प्रवीण देसाई)