कुस्ती पंढरी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा आजपासून थरार, चारशे महिला कुस्तीगीरांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 12:22 PM2023-04-25T12:22:33+5:302023-04-25T12:39:49+5:30
पहिला महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या महिला कुस्तीगीरास चारचाकी, तर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
कोल्हापूर : भारतीय कुस्ती महासंघाने राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थायी समितीच्या परवानगीने व दीपाली सय्यद-भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने पहिली महिला राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व पहिली महिला महाराष्ट्र केसरी किताबासाठी आज, मंगळवारपासून सुरुवात होत आहे. या सर्व स्पर्धा राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात होणार आहे, अशी माहिती आयोजक दीपाली सय्यद-भोसले यांनी दिली.
महिला कुस्तीला चालना देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा ६८ ते ७६ किलो गटात होणार आहे. सर्व वजनी गटातील पहिला क्रमांक पटकाविणाऱ्या महिला कुस्तीगीरांना दुचाकी बक्षीस दिली जाणार आहे. पहिला महाराष्ट्र केसरी किताब पटकाविणाऱ्या महिला कुस्तीगीरास चारचाकी, तर द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या कुस्तीगीरांना रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीगीरही सहभागी होणार आहेत. यात ५०, ५३, ५५, ५७, ५९, ६२, ६५ ६८, ७२ किलोगटात होणार आहे, तर खुल्या गटासाठी ६८ ते ७६ किलो गृहीत धरला आहे. राज्यभरातून स्पर्धेसाठी एकूण ४०० स्पर्धक सहभागी झाले आहेत.