समानतेसाठी महिला धावणार
By admin | Published: March 3, 2016 12:21 AM2016-03-03T00:21:22+5:302016-03-03T00:23:22+5:30
‘प्लेज फॉर पॅरिटी’ : लोकमत सखी मंच, एक्सप्लोर कोल्हापूरतर्फे वूमनोथॉन
कोल्हापूर : स्त्री-पुरुष समानतेबाबत जनजागृतीसह स्त्रियांच्या आरोग्यासाठी चालणे व धावणे हा उत्तम व्यायाम आहे, असा संदेश देण्यासाठी ‘लोकमत’ सखी मंच व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांच्यावतीने महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि. ६) सकाळी साडेसहा वाजता मेरी वेदर ग्राउंडपासून वूमनोथॉन रॅली आयोजन करण्यात आले आहे.
आजच्या आधुनिक युगात स्त्री सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकीय अशा सर्व क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहे; परंतु जागतिक स्तरावरसुद्धा स्त्री-पुरुष समानता अनेक ठिकाणी अजूनही पाहण्यास मिळत नाही. यासाठी यंदा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला दिन ‘प्लेज फॉर पॅरिटी’ अर्थात ‘स्त्री-पुरुष समानतेची शपथ’ ही संकल्पना रुजविण्यात येणार आहे.
स्त्री व त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांचा आदर, त्यांचा सन्मान हा सर्व क्षेत्रांमध्ये उंचाविण्यासाठी घेतलेली शपथ म्हणजे ‘प्लेज फॉर पॅरिटी’ होय. स्त्रियांनी यामध्ये जेवढे जमेल तेवढे अंतर चालून अथवा पळून पूर्ण करावयाचे आहे. सर्वांनी या उपक्रमासाठी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘एक्सप्लोर कोल्हापूर’ या संघटनेच्यावतीने लोकांच्यामध्ये सायकलिंगसह व आरोग्याचे महत्त्व रुजविण्यासाठी प्रयत्न करणारी संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून अनेक सायकलिंग रॅलीसह ट्रेकिंगचे आयोजन करण्यात येते. यासाठी संघटनेचे संस्थापक सिद्धार्थ साळोखे, बिपीन मिरजकर, विक्रम भोसले, नरेंद्र गवळी यांच्या संकल्पनेतून ही संघटना कार्यरत आहे.
मेरी वेदरपासून सकाळी सहा वाजता रॅलीस सुरुवात होणार पाच किलोमीटर इतक्या अंतराची धावणे किंवा चालून पुन्हा मेरी वेदर येथेच यांची सांगता होईल. त्यामध्ये सखी मंच सदस्यांसह सर्वांसाठी मोफत प्रवेश असून, या नोंदणी लोकमत कार्यालय, लक्ष्मीपुरी कोंडा ओळ किंवा ँ३३स्र२://स्र’ीॅिीाङ्म१स्रं१्र३८.ङ्मिं३३ील्ल.िूङ्मे यावर करावी.
मी या वूमनोथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी खास मुंबईहून येथे येत आहे. महिलांनी घराबाहेर पडले पाहिजे. त्यांनाही आकांक्षा व भावना आहे. बाहेरच जग त्यांनीही पाहिले पाहिजे. यासाठी मी मुंबईत काम करतेच पण त्यांचसोबत कोल्हापुरातील महिलांना हा संदेश देण्यासाठी मी यामध्ये सहभागी होणार आहे.
डॉ. दीपा कदम