नवी ऊर्जा मिळवीत धावल्या महिला

By admin | Published: March 6, 2016 11:54 PM2016-03-06T23:54:39+5:302016-03-07T00:17:28+5:30

प्लेज फॉर पॅरिटी : दोन हजार महिला रस्त्यांवर; ‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’च्यावतीने आयोजन

Women running new energy | नवी ऊर्जा मिळवीत धावल्या महिला

नवी ऊर्जा मिळवीत धावल्या महिला

Next

कोल्हापूर : नोकरी, संसारातील साऱ्या कटकटी बाजूला ठेवून मनमुरादपणे ‘त्या’ गाण्याच्या ठेक्यावर स्वार झाल्या आणि पाहता-पाहता त्यांनी कधी नव्हे तो एकच ताल धरला. अमाप जल्लोषाची अनुभूती त्यांनी घेतली. जणू स्पर्धेच्या जगात पुन्हा नेटाने सामोरे जाण्यासाठी त्या नवी ऊर्जा मिळवीत होत्या. असाच काहीसा भास रविवारी मेरी वेदर मैदानावर ‘प्लेज फॉर पॅरिटी’साठी जमलेल्या शेकडो महिलांच्या उत्साहामधून अनुभवण्यास मिळाला.
‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून स्त्री-पुरुष समानतेसाठी ‘वूमनोथॉन’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, ‘मिसेस इंडिया २०१४’ ची मानकरी अमृता मोरे, नगरसेवक अर्जुन माने, डॉ. सीमा देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. दोन हजार महिलांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करूनसुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीत आजही समाजात महिलांना दुय्यम स्थानच दिले जाते. त्यांना या संस्कृतीत मानाचे स्थान प्राप्त व्हावे, त्यांच्या हक्कांची जाणीव निर्माण करून देण्याच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी सकाळी साडेसहा वाजता मेरी वेदर मैदानापासून पाच किलोमीटर इतक्या अंतराच्या धावणे किंवा चालणे या स्वरूपाच्या ‘वूमनोथॉन’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे साडेपाच वाजल्यापासूनच कोल्हापूर शहरातील व परिसरातील अनेक महिला गटागटाने या ठिकाणी कार्यक्रमस्थळी दाखल होत होत्या. यावेळी ‘एक्सप्लोर कोल्हापूर’च्या स्वयंसेवकांमार्फत नोंदणी करून व बॅच देऊन त्यांना मुख्य व्यासपीठाजवळ सोडण्यात येत होते. महिलांनी परिधान केलेल्या पांढऱ्या व गुलाबी पोशाखामुळे मैदानावरील दृश्य नेत्रसुखद भासत होते. यावेळी कार्यक्रमासाठी आकर्षकपणे सजविलेल्या व्यासपीठावर अनुराधा भोसले व ग्रुपच्या वतीने सादर करण्यात आलेल्या झुंबा ड्रान्सने सर्वांचे लक्ष वेधत आपल्या तालावर डोलण्यास भाग पाडले. त्यानंतर शेफाली मेहता यांनी पुन्हा एकदा सादर केलेल्या झुंबा डान्सच्या हिंदी आवृत्तीगीताने वातावरणात एकच उत्साह संचारला होता.
रॅलीच्या उद्घाटक मधुरिमाराजे म्हणाल्या, अनेक महिलांची दिवसाची सुरुवात कामातून होते व दिवसाचा शेवटही कामातच होतो. महिलांना आपले मन मोकळे करण्यासाठी, निवांत वेळ घालविण्यासाठी वेळच मिळत नाही. मात्र ‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांनी पुढाकार घेत महिलांना भावना मोकळ्या करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिलेच; त्यासोबत स्त्री-पुरुष समानता रुजविण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याने हा उपक्रम कौतुकास्पद आहे. प्रत्येक घरातील आई ही त्या घराचा मुख्य वासा असते आणि जर मुख्य वासा डगमगला तर संपूर्ण घर हलते. त्यामुळे महिलांनी या धावपळीच्या युगात स्वत:ला मानसिक व शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवावे. तसेच महाराष्ट्रभर दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे, याचा विचार करून शक्य तितका पाण्याचा वापर आटोपशीर करून गैरवापर टाळावा, असे आवाहनही त्यांनी केले.
मेरी वेदर मैदानातून रॅलीस सुरुवात झाली. एस. पी. आॅफिस, होली क्रॉस, आदित्य कॉर्नर, महावीर कॉलेज, पुन्हा मेरी वेदर मैदान असे रॅलीचे पाच किलोमीटरचे अंतर शेकडो महिलांनी धावत व चालत उत्साहात पूर्ण केले. अगदी साठीतील ज्येष्ठ महिलाही तरुणाईला लाजवेल असा जल्लोष साजरा करीत यामध्ये सहभागी झाल्या होत्या. हे अंतर पार करून आलेल्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर लढाई जिंकल्याचा आनंद दिसत होता. यानंतर प्रत्येक सहभागी महिलेला प्रमाणपत्र देण्यात आले. सूर्य जसा उगवतीकडे लागला तसे प्रत्येकीला परतीचे वेध लागले. एकूणच एक जल्लोष अनुभवल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होता.
या उपक्रमाचे नियोजन ‘एक्सप्लोर कोल्हापूर’चे सिद्धार्थ साळोखे, विक्रम भोसले, बिपीन मिरजकर, नरेंद्र गवळी, रमजान गणीभाई, विनायक हिरेमठ, प्रिया साळोखे, रूपाली भोसले, ऐश्वर्या मिरजकर, सिमरन गणीभाई यांनी केले होते. यावेळी बेबी ओये, सबवे, बाकसिंग रॅबिनस्, बिबा, डीवायपी सिटी, शॉपर स्टॉप, स्फूर्ती, गोकुळ, कोल्हापूर सायकल ग्रुप, कुट्झ, हे प्रायोजक होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप बकरे, अमित चव्हाण, संतोष जाधव, शैलेंद्र मोहिते, करण मिरजकर, रुमाना अत्तार, रेव्हा हावळ, सागर कोल्हेकर, शिवराज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


जीवनाचा मनसोक्त आनंद लुटा
स्त्रीच्या आयुष्यात मुलगी, पत्नी आणि माता असे तीन टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात प्रत्येक मुलीने आपल्या करिअरचा मार्ग निश्चित करावा. दुसऱ्या टप्प्यात आपला संसार, जबाबदाऱ्या व करिअरकडे लक्ष द्यावे; तर शेवटच्या टप्प्यात पहिले दोन्ही टप्पे सांभाळत जगण्याचा मनसोक्त आनंद उपभोगायला हवा, असा सल्ला ‘मिसेस इंडिया २०१४’ची मानकरी अमृता मोरे यांनी उपस्थितांना दिला.


कोल्हापूरमध्ये सर्वच वयोगटांतील महिलांना एकत्र आणणारे असे कार्यक्रम खूपच कमी होतात. या उपक्रमामुळे लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच एकत्र आणले. वयाचे भान विसरून साऱ्यांनी तुफान डान्स केला. ‘वूमनोथॉन’मध्ये भाग घेतला. हा माझ्यासाठी अविस्मरणीय अनुभव होता.
- गायत्री पटेल


महिलांसाठी असा उपक्रम पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये होत असल्याने सहभागी होताना खूप छान वाटले. रोजच ‘मॉर्निंग वॉक’च्या निमित्ताने चालणे होते; पण आज वेगळाच उत्साह जाणवला.
- सोनल सातपुते
या उपक्रमामुळे महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. जेणेकरून त्याही निर्भयपणे पुरुषांच्या बरोबरीने मॅरेथॉनसारख्या क्रीडा प्रकारात भाग घेऊन आपली क्षमता सिद्ध करू शकतात. महिलांना परत एकदा मानाचे स्थान मिळाले आहे.
- डॉ. आशा रेगे


महिलांसाठी राबविलेला सर्वांत सुंदर असा हा उपक्रम आहे. त्यामुळे सर्वच वयोगटांतील महिलांना महत्त्वाचे स्थान मिळाले. उत्साहाने भारलेल्या या वूमनोथॉन रॅलीत सहभागी झाल्याचा आनंद अवर्णनीय आहे. अशाप्रकारचे उपक्रम नेहमी व्हायला हवेत.
- नूतिका चव्हाण
‘लोकमत आणि एक्सप्लोर कोल्हापूर’ यांची ही संकल्पना आमच्यासाठी एक सुंदर अनुभव होता. बेधुंदपणे गाण्यावर ठेका धरायला मिळाल्याने खूप आनंद झाला.
- प्रा. गौरी म्हेतर


आयुष्यात स्त्री-पुरुष असा भेदभाव कधी मानू नये. जरी आपले वय झाले तरी मनाने कधी थकायचे नाही. हेच उत्साही मन तुम्हाला निरोगी व सुदृढ बनविण्यास मदत करते.
- प्रभावती पाटील (वय ७६)

आज महिला सक्षम झाल्या आहेत. मात्र, समाजात स्त्री-पुरुष समानतेबाबत अजूनही प्रबोधन झालेले नाही. अशा उपक्रमांतून ही दरी कमी होण्यास मदत होईल. ही रॅली आयोजित केल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद!
- सुरेखा गंभीर, कागल


नेटके नियोजन
‘एक्सप्लोर कोल्हापूर’च्यावतीने मैदानात नेटके नियोजन करण्यात आले होते. शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित राहूनसुद्धा स्वयंसेवकांमार्फत त्यांना प्रवेश दिला जात होता. यासह रॅलीच्या मार्गावर जागोजागी स्वयंसेवक उपस्थित राहिल्याने कोणताही गोंधळ निर्माण झाला नाही. सहभागींना पाण्याच्या बाटल्या, बिस्किटे, दूध वाटप करण्यात येत होते.


मेरी वेदर मैदानावर ‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’ यांच्यावतीने महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘प्लेज फॉर पॅरिटी’ या वूमनोथॉन रॅलीचे उद्घाटन मधुरिमाराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ‘मिसेस इंडिया २०१४’ अमृता मोरे, नगरसेवक अर्जुन माने, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. दुसऱ्या छायाचित्रात स्त्री-पुरुष समानतेसाठी आयोजित ‘वूमनोथॉन’ रॅली यशस्वी करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’ व ‘एक्सप्लोर कोल्हापूर’च्या या टीमने विशेष प्रयत्न केले.

Web Title: Women running new energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.