बलात्काऱ्यांच्या एन्काऊंटरनंतर महिलांनी वाटली साखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 04:12 PM2019-12-07T16:12:47+5:302019-12-07T16:15:12+5:30
बलात्काराच्या आजपर्यंतच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळालेला नाही. अनेक आरोपी मोकाट आहेत. हे चित्र बदलणारी घटना शुक्रवारच्या एन्काउंटरमुळे घडली; यामुळे समाजात अशी जरब बसेल की मुली, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची अमानुषपणे हत्या करणे याला जिवे मारण्याचीच शिक्षा मिळेल. खरे तर हा दिवस आनंद साजरा करण्याचा नाही; पण याद्वारे पोलिसांचे अभिनंदन करीत आहोत, अशा भावना व्यक्त करीत कोल्हापुरातील महिलांनी हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काऊंटरनंतर साखर वाटप केले.
कोल्हापूर : बलात्काराच्या आजपर्यंतच्या घटनांमध्ये पीडितांना न्याय मिळालेला नाही. अनेक आरोपी मोकाट आहेत. हे चित्र बदलणारी घटना शुक्रवारच्या एन्काउंटरमुळे घडली; यामुळे समाजात अशी जरब बसेल की मुली, महिलांवर बलात्कार करणे, त्यांची अमानुषपणे हत्या करणे याला जिवे मारण्याचीच शिक्षा मिळेल. खरे तर हा दिवस आनंद साजरा करण्याचा नाही; पण याद्वारे पोलिसांचे अभिनंदन करीत आहोत, अशा भावना व्यक्त करीत कोल्हापुरातील महिलांनी हैदराबादमधील बलात्काऱ्यांच्या पोलिसांकडून झालेल्या एन्काऊंटरनंतर साखर वाटप केले.
भारतात समतेचा संदेश देणारे, या देशाला कायदा, संविधान बहाल केलेले महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनीच पीडित दिशाला यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त झाली.
हैदराबाद येथील पीडित दिशा या रात्री घरी परतत असताना त्यांच्यावर चार नराधमांनी बलात्कार केला व नंतर त्यांना जाळून मारण्यात आले. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. स्त्रीवर बलात्कार होतो, वासनांधतेची बळी झाल्यावरही तिची अमानुषपणे हत्या केली जाते; पण न्यायालयात वर्षानुवर्षे खटला चालूनही दोषींना कठोर शिक्षा होत नाही. राजकीय दबावातून अनेकजण सुटतात, पीडितेला तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळत नाही. त्यामुळे अशा नराधमांना भर चौकात मारले पाहिजे, अशी मागणी होत होती.
महिलांसह सर्वसामान्यांमधून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पहाटे हैदराबाद पोलिसांनी चारीही बलात्कारी आरोपींवर गोळ्या झाडून त्यांचे एन्काऊंटर केले. ही बातमी सकाळी सगळीकडे पसरली. हे धाडसी पाऊल उचलल्याबद्दल देशभरातून हैदराबाद पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.
कोल्हापुरातील विविध महिला संघटना, वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिला, युवती, सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांनी केलेल्या एन्काउंटरचे साखर वाटून स्वागत केले. बिंदू चौकात पीडिता दिशा यांना आदरांजली वाहणारे संदेश, नराधमांचा निषेध करणारे फलक घेऊन महिला एकत्र आल्या.
येथे नागरिक, वाहनचालक, पोलीस, रिक्षाचालक, व्यापारी यांना साखर वाटण्यात आली. यावेळी डॉ. मंजुळा पिशवीकर, डॉ. प्रिया दंडगे, शुभांगी थोरात, वारणा वडगावकर, अॅड. श्रद्धा शहा, स्वप्नजा घाटगे, स्मिता ओतारी, प्रिया देसाई, ललिता शिंदे, मंजिरी देवण्णावर, स्वाती जाधव, सिद्धी जाधव, योगिता गुळवणी, कविता मोहोळकर यांनी सहभाग घेतला.
समाजमाध्यमांवर अभिनंदनाचे पोस्ट
पोलिसांनी उचललेल्या धाडसी निर्णयाचे वृत्त सगळीकडे पसरल्यानंतर सकाळपासूनच व्हॉट्स अॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामसारख्या समाजमाध्यमांवर पोलिसांच्या अभिनंदनाच्या पोस्ट टाकल्या जात होत्या. हैदराबाद पोलीस अभिनंदन, दिशाला न्याय मिळाला, इललिगली लिगल, मृत्यूनंतरचा आनंद, बलात्कारी पोसायचे नसतात; ठोकायचे असतात, देशभरात हैदराबाद पॅटर्न राबविला पाहिजे, ना कोर्ट - ना वकील - ना तारीख; छत्रपती शासन - सरळ एन्काउंटर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया यावेळी उमटल्या.