महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करावे...

By admin | Published: May 5, 2016 12:46 AM2016-05-05T00:46:42+5:302016-05-05T00:48:14+5:30

माधवी नाईक : भाजप महिला आघाडीचा सबलीकरण मेळावा उत्साहात

Women should empower women through a savings group ... | महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करावे...

महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करावे...

Next

कोल्हापूर : राज्य सरकार राबवत असलेल्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ उठवीत शहरातील महिलांनी एकत्रित होऊन बचतगटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय स्थापन करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पक्षाच्यावतीने बुधवारी येथील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये महिला सबलीकरण मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. माधवी नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. मेळाव्यास जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, महिला प्रदेश सरचिटणीस भारतीताई दिगडे आदी प्रमुख उपस्थित होते.
संपूर्ण मेळाव्यात अ‍ॅड. माधवी नाईक यांनी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली. त्या म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकार महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असून कोल्हापूर शहरातील महिलांनी या योजनांची सखोलपणे माहिती घ्यावी तसेच महिलांनी एकत्रित होऊन बचत गटांच्या माध्यमातून वेगवेगळे व्यवसाय करून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील राहावे.
सरकारमार्फत मुद्रा योजना, घरकुल योजना, दारिद्र्यरेषेखालील लोकांसाठी मोफत गॅस जोडणी आदी योजनांमध्ये महिलांना मोठ्या प्रमाणात अर्थसहाय्य करण्यात येते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती घेतली असून या योजनेचा लाभ सर्वसामान्य महिलांना मिळवून देण्यासाठी भाजप कोल्हापूर महिला आघाडीने प्रयत्नशील राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुमती पावनगडकर यांनी केले. यावेळी भारतीय जनता पक्ष महिला आघाडीमध्ये रजनी क्षीरसागर, अनिता काळे, प्रमोदिनी हार्डिकर (सांगलीकर) यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
पाहुण्यांची ओळख सुनीता सूर्यवंशी यांनी करून दिली. प्रभावती इनामदार यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन अ‍ॅड. अमिता कुलकर्णी यांनी केले होते. या कार्यक्रमास माजी अध्यक्ष महेश जाधव, नगरसेविका गीता गुरव, जयश्री जाधव, उमा इंगळे, सविता भालकर, अश्विनी बारामते, भाग्यश्री शेटके, मनिषा कुंभार, यांच्यासह भारती जोशी, आकुताई जाधव, प्रभा टिपुगडे, सुलभा मुजुमदार, विजयमाला जाधव, पद्मिनी डोंगरकर, अनिता वैद्य यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: Women should empower women through a savings group ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.