शिंगणापुरात मूलभूत सुविधांसाठी महिला रस्त्यांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:50 AM2020-12-11T04:50:40+5:302020-12-11T04:50:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) येथे शाकंभरी कॉलनीमध्ये रस्ते, गटार व वीज या मूलभूत सुविधांसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपार्डे : शिंगणापूर (ता. करवीर) येथे शाकंभरी कॉलनीमध्ये रस्ते, गटार व वीज या मूलभूत सुविधांसाठी महिलांनी रस्त्यातील खड्ड्यांत बसून आंदोलन केले. लवकरात लवकर आमच्या मागण्यांची पूर्तता न झाल्यास शिंगणापूरचा मुख्य रस्ता बंद करण्याचा इशारा महिलांनी यावेळी दिला. शिंंगणापूरच्या शाकंभरी कॉलनीमध्ये गल्ली नंबर दोन व गल्ली नंबर तीनमध्ये रस्ते नाहीत, गटारी नाहीत, वीज नाही. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गटारी नसल्यामुळे गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहत आहे. यामुळे दुर्गंधी व डासांचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे साथीचे रोग पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच सिद्धेश्वरनगरमधील गणेश कॉलनीमध्ये रस्ते, गटारी व विजेचा प्रश्न प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही या सुविधा मिळत नसल्याने शाकंबरी व सिद्धेश्वरनगरमधील महिलांनी थेट रस्त्यातील खड्ड्यात बसून आंदोलन केले. यावेळी महिलांनी मागणीचे निवेदन ग्रामपंचायतीला दिले. या मागण्यांंची दखल घेऊन सोयी-सुविधा न मिळाल्यास थेट मुख्य रस्ता बंद करू, असा इशारा महिलांनी दिला. यावेळी सदस्य किरण पाटील, दीपक कांबळे, सुवर्णा आवळे, दत्ता आवळे, ग्रामसेवक गायत्री जाखलेकर यांनी प्रत्यक्ष रस्त्यांवरून वाहणाऱ्या सांडपाण्याची पाहणी केली. यावेळी महिला आशा पाडळकर, अनिता पाटील, अनिता सूर्यवंशी, उषा सावंत, आसमा बल्लारी, सविता फटकरे व कॉलनीतील महिला उपस्थित होत्या.
फोटो १० शिंगणापूर महिला आंदोलन
शिंगणापूर (ता. करवीर) येथे शाकंभर व सिद्धेश्वर कॉलनीतील महिलांनी रस्ता, गटार,सांडपाणी व वीज या मूलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी रस्त्यात बसून आंदोलन केले.