महिलांनी ‘पद्माराजे’ स्केटिंग ट्रॅक उखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 12:44 AM2017-11-13T00:44:48+5:302017-11-13T00:46:02+5:30
कोल्हापूर : शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राला परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शविला असतानाच, येथे कोणत्याही परिस्थितीत बांधकाम करू दिले जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याच पार्श्वभूमीवर रविवारी पद्माराजे उद्यानात गेले अनेक वर्ष सुरू असलेला स्केटिंग ट्रॅक महिलांनी उखडून संताप व्यक्त केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते.
शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात युद्धकला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याविरोधात पद्माराजे उद्यान परिसरातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन दिवसांपूर्वी याप्रश्नी महापालिका प्रशासनाला नागरिकांनी निवेदन दिले होते. रविवारी पुन्हा या प्रकरणाचा उद्रेक झाला. सायंकाळच्या सुमारास अचानक शिवाजी पेठेतील महिला एकत्र येऊन त्यांनी पहार, सळ्यांच्या सहाय्याने उद्यानातील स्केटिंग ट्रॅकवरील
फरशा उघडून टाकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या
प्रकाराने नागरिकांची तारांबळ
उडाली.
साधारणत: सुमारे अर्धा तास हे ट्रॅक उखडण्याचे काम सुरू होते. हा संपूर्ण ट्रॅक चार ते पाच ठिकाणी उखडून प्रचंड नुकसान केले. उद्यानात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, पद्माराजे उद्यानात कोणतेही बांधकाम करू दिले जाणार नाही, उद्यानाचे सांैदर्य जतन करावे. मात्र, जर नागरिकांना डावलून बांधकाम करणाºयांना तीव्र विरोध दर्शविण्यात येईल, असे नागरिकांनी यावेळी सांगितले.
एकतर्फी निर्णय नाही : महापालिका प्रशासन
गेल्या आठवड्यात मंगळवारी राजे संभाजी तरुण मंडळाच्या सभागृहात एकत्र येऊन कोणत्याही स्थितीत पद्माराजे उद्यानामध्ये प्रस्तावित युद्धकला प्रशिक्षण केंद्राचे बांधकाम करू दिले जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली आहे. यासाठी गुरुवारी (दि.९) नागरिकांनी महापालिका प्रशासनाला याबाबत निवेदन देऊन भूमिका स्पष्ट केली आहे. यावर नागरिकांच्या हरकती व सूचना घेऊन निर्णय घेण्यात येईल. नागरिकांचा विरोध घेऊन कोणताही एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही, असे आश्वासन महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिले आहे.