टी.व्ही.तील स्त्रियांचे अंधानुकरण नको
By Admin | Published: January 29, 2015 12:01 AM2015-01-29T00:01:25+5:302015-01-29T00:16:46+5:30
स्मिता कोल्हे : वाचन मंडळाचे उद्घाटन
कोल्हापूर : स्त्री ही आदिमाता असून, सृष्टीची विकासक आहे. स्त्रियांच्या अंगभूत क्षमतेमुळे ती प्रस्थापित व्यवस्थेमध्ये टिकून राहिली आहे. तिच्यामध्ये समाजव्यवस्था बदलण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन समाजसेविका डॉ. स्मिता कोल्हे यांनी येथे केले. स्त्रियांनी केवळ टी.व्ही.मध्ये दिसणाऱ्या महिलांचे अंधानुकरण करत स्वत:ची किंमत कमी करून घेऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसच्या न्यू कॉलेज येथे ‘ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील वाचन मंडळ’च्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ. रवींद्र कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कोल्हे म्हणाल्या, जे आपल्याला दिसत नाही, ते चांगले आहे की वाईट हे आपल्याला ठरविता येत नाही. त्या गोष्टी करून स्त्री स्वत:ला संकटात टाकत आहे. या क्षणिक, क्षुल्लक गोष्टीच्या प्रभावाने आजच्या मुली स्वत:चे सामर्थ्य ओळखू शकत नाहीत, ही शोकांतिका वाचनाने दूर करता येईल.
डॉ. रवींद्र कोल्हे म्हणाले, मेळघाटातील आदिवासी हे तथाकथित प्रगत जागतिकांपेक्षा जास्त संस्कारित असून, मूल्यांची जोपासना ते स्वभावातच करतात. प्रगत समाजातील स्वार्थ, लबाडी, स्त्रीला भोगवस्तू मानणे या दुर्गुणांपासून ते अलिप्त आहेत. निसर्गाचा सन्मान राखून ते स्वत:च्या गरजा भागवितात. स्त्री-पुरुष असा श्रेष्ठ-कनिष्ठ फरक केला जात नाही. आदिवासी कोरकू समाजामध्ये स्त्री जन्माचा उत्सव साजरा केला जातो. स्त्री-धन हे तिचेच असते. नवरा किंवा कोणीही ते हिरावून घेऊ शकत नाही.
प्रा. विनय पाटील म्हणाले, वाचन संस्कृती जोपासून ती वाढविणे ही आजची गरज बनली आहे. हायस्कूल व कॉलेजमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी वाचन मंडळे उपयोगी ठरतात.
वाचनकट्ट्याचे सदस्य युवराज कदम यांनी वाचन मंडळ चालविण्यासंदर्भात मौलिक सूचना दिल्या. डॉ. एन. व्ही. नलवडे यांनी ‘बुके नको, बुक द्या’ व ‘प्रत्येक घरी एक पुस्तक दर महिना’ या योजना राबविल्यामुळे वाचन चळवळीला बळ प्राप्त झाल्याचे सांगितले.
यावेळी प्रा. विलास रणसुभे, डॉ. शशिकांत चौधरी, रमेश राशिवडेकर, लेखक डॉ. मधुकर निरांजे, डॉ. अरुंधती पवार, प्रा. आर. एस. किरूळकर, प्रा. पी. व्ही. डोणे, प्रा. व्ही. डी. किल्लेदार, आदी उपस्थित होते. प्रा. टी. के. सरगर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. यू. के. गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य प्रा. यू. पी. शेवाळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)