महिला बालकल्याण सभापती निवडीस तूर्त मनाई
By admin | Published: May 14, 2016 01:28 AM2016-05-14T01:28:50+5:302016-05-14T01:28:50+5:30
सोमवारी पुढील सुनावणी : वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा आदेश
कोल्हापूर : महानगरपालिक ा महिला व बालकल्याण समिती सभापती निवडीला येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाने शुक्रवारी तूर्त मनाई आदेश दिला.
मंगळवारी होणाऱ्या सभापती निवडणुकीची प्रक्रिया सुरू होत असतानाच न्यायालयाने हा निकाल दिल्यामुळे सत्तारूढ काँग्रेस-ताराराणी आघाडी आणि प्रशासन यांच्यात मोठी खडाजंगी उडाली. त्यामुळे महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला. न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे मनाई आदेश कायम होणार की उठविला जाणार हे त्याच दिवशी स्पष्ट होईल.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वृषाली कदम यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे सभापतिपद रिक्त झाले आहे. नवीन सभापती निवडीसाठी मंगळवारी (दि. १७ मे) महिला बालकल्याण समितीची सभा जिल्हाधिकारी अमित सैनी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. राजकीय सत्तासंघर्षातून वृषाली कदम यांचे नगरसेवकपद घालविले असल्याचा समज काँग्रेस नगरसेवकांचा झाला आहे. त्यामुळे नवीन सभापती निवडीला स्थगिती मिळविण्यासाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात गुरुवारी याचिका दाखल केली होती. त्यावर देशमुख यांचे वकील सासवडे यांनी एक तास युक्तिवाद करून या निवडीला स्थगिती मिळावी म्हणून मागणी केली होती.
शुक्रवारी दुपारी न्यायाधीश श्री. डफळे यांनी मंगळवारी होणाऱ्या सभापती निवडीला तूर्त मनाई आदेश दिला. सोमवारी महानगरपालिका प्रशासनास न्यायालयात येऊन म्हणणे मांडण्यास न्यायालयाने बजावले आहे. त्यामुळे आता सोमवारी महानगरपालिका आपली बाजू सोमवारी न्यायालयात मांडणार आहे. मनाई आदेश कायम राहणार की तो उठविला जाणार हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सभापती निवडणूक आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडली आहे.
जातीचे दाखला अवैध ठरल्यामुळे महापौर, महिला बालकल्याण समिती सभापतिसह सात जणांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. महानगरपालिकेतील सत्तासंघर्षातून हे सगळे घडल्याचा आक्षेप कॉँग्रेसने नोंदविला असून ही सर्व प्रकरणे उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली आहेत. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)