महिला आयोग अध्यक्ष निवडीची जाहिरात २४ तासांत रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:11 AM2019-01-19T06:11:22+5:302019-01-19T06:11:27+5:30
- समीर देशपांडे कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी रोजी काढलेली जाहिरात २४ तासांत रद्द ...
- समीर देशपांडे
कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी १५ जानेवारी रोजी काढलेली जाहिरात २४ तासांत रद्द करण्यात आली. भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या विजया रहाटकर या आयोगाच्या अध्यक्ष असताना अचानक जाहिरात आल्याने आयोगात खळबळ उडाली.
रहाटकर अध्यक्षा असलेल्या या आयोगामध्ये नीता ठाकरे, गयाबाई कराड, विंदा कीर्तीकर, देवयानी ठाकरे (भाजपा) आणि आशा लांडगे (रिपाइं) सदस्य आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक हे आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतात. शिवसेनेच्या कोट्यातून एका महिलेची नियुक्ती सदस्य म्हणून आयोगावर करण्यात आली होती. पण त्या फिरकल्याच नाहीत. आपल्याला अध्यक्षपद कबूल करण्यात आले होते आणि सदस्य पदावर आपली बोळवण करण्यात आली या नाराजीतून त्या फिरकल्या नाहीत, असे त्यावेळी बोलले गेले. नियमानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द झाले. आयोगाची तीन वर्षांची मुदत ९ फेबु्रवारी २०१९ रोजी संपणार आहे. नव्या अध्यक्ष आणि सदस्यांकरता अर्ज मागविण्यासाठी १५ जानेवारी रोजी दोन दैनिकांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली.
यात अध्यक्षपदासाठी पात्रताही नमूद करण्यात आली होती. तसेच हे अर्ज सादर करताना त्यासमवेत कोणती कागदपत्रे आणि पूरक माहिती जोडावी, हेही होते. मात्र ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पूर्वीची जाहिरात अपरिहार्य कारणामुळे रद्द करण्यात आल्याची दुसरी जाहिरात १७ जानेवारीला देण्यात आली आहे.
त्यामुळे जुन्या जाहिरातीनुसार कुणीही अर्ज करू नयेत; त्यांची दखल घेतली जाणार नाही, असेही या नव्या जाहिरातीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यमान समितीला मुदतवाढ देणार की कसे, याबाबत अंदाज न घेता किंवा विचारणा न करता ही जाहिरात काढण्यात आल्याने ती रद्द करावी लागल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असल्याने रहाटकर यांना मुदतवाढीची शक्यता आहे.