महिला काँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2016 12:20 AM2016-06-24T00:20:38+5:302016-06-24T00:52:03+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी : महागाईविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

Women's Congress demonstrations | महिला काँग्रेसची निदर्शने

महिला काँग्रेसची निदर्शने

Next

कोल्हापूर : सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली असून, त्याला ‘कृषी कल्याण अधिभार’ असे नाव देण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. त्याच्या निषेधार्थ गुरुवारी जिल्हा महिला काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास काँग्रेसच्या महिला पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटल्या. या ठिकाणी महागाईविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली. त्यानंतर महापौर अश्विनी रामाणे, महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सरला पाटील, जिल्हाध्यक्षा अंजना रेडेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन सादर केले.
दि. १ जूनपासून सेवाकरात ०.५ टक्के वाढ झाली आहे. याशिवाय विनाअनुदानित सिलिंडरचे दरदेखील २१ रुपयांनी वाढविण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. दि. २६ मे २०१४ ला आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत १०८ डॉलर प्रतिबॅरेल होती, आता हीच किमत ५० डॉलरपेक्षाही कमी आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती सुमारे ५५ टक्क्यांनी घसरल्या असताना केंद्र सरकार त्याचा लाभ भारतातील सामान्य पेट्रोल व डिझेल ग्राहकांना का मिळवून देत नाही? पेट्रोल, डिझेलच्या किमतीदेखील कच्च्या तेलाच्या किमतीच्या प्रमाणात कमी का होत नाहीत? असे प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. सेवाकरातील करवाढीमुळे रेल्वे प्रवास, वैद्यकीय तपासणी, विमा, मोबाईल बिल, शिवनेरी व अन्य वातानुकूलित बसप्रवास, चित्रपटाची तिकिटे, बँकिंग, हॉटेल, आदी सेवा महागणार आहेत. विशेष म्हणजे सेवाकरातील या ०.५ टक्के करवाढीला ‘कृषी कल्याण अधिभार’ असे नाव देण्यात आले आहे. मागील दोन वर्षांत केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाही. अशा परिस्थितीत हा अधिभार लादण्याचा सरकारला काय नैतिक अधिकार आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होत आहे. या निर्णयामुळे महागाईत प्रचंड वाढ होऊन सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसणार आहे. जनतेवर सरकारने लादलेली ही भाववाढ अन्यायी आहे. त्यामुळे केंद्राने ही सर्वप्रकारची दरवाढ व करवाढ मागे घ्यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आंदोलनात शहराध्यक्षा संध्या घोटणे, महापालिका महिला बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, करवीर पंचायत समिती सभापती स्मिता गवळी, जयश्री मेडशिंगे, दीपा पाटील, चंदा बेलेकर, सुलोचना नाईकवडे, लीला धुमाळ, विद्या घोरपडे, आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: Women's Congress demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.