संस्कारक्षम पिढी बनविण्यात महिलांचे योगदान :बलकवडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:51 PM2020-11-24T16:51:02+5:302020-11-24T16:54:11+5:30
muncipaltycarporation, kolhapurnews आपल्या मुलांना घडविण्याचं काम महिलाच करीत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शावत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी येथे काढले.
कोल्हापूर : आपल्या मुलांना घडविण्याचं काम महिलाच करीत असून नवी पिढी शिक्षित, संस्कारक्षम आणि आदर्शावत बनविण्यात महिलांचे योगदान सर्वार्थाने महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी मंगळवारी येथे काढले.
महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाच्यावतीने कौमी एकता सप्ताहनिमित्त स्थायी समिती सभागृहात आयोजित केलेल्या महिला दिन कार्यक्रमात प्रशासक बलकवडे बोलत होत्या, कार्यक्रमास उप-आयुक्त निखिल मोरे यांच्यासह महानगरपालिकेतील महिला अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या.
महिलांनी आपल्या कर्तुत्वातून समाजातील अनेक क्षेत्रात निर्धारपूर्वक आणि आदर्शावत काम केले आहे. समाजात काम करतांनाही आदर्श कुटुंब बनविण्यात त्या मागे नाहीत. महिलांना संधी मिळाल्यास त्या संधीचं सोनं करतात, आजही महिलांनी फायटर जेट ते आदर्श गृहीणी म्हणूनही लौकीक प्राप्त केला असल्याचे गौरवोदगारही बलकवडे यांनी काढले. महानगरपालिकेतही महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांनी नेटकं काम करुन आपल्या महानगरपालिकेची गौरवशाली परंपरा अधिक वृध्दींगत करावी, असे आवाहन त्यांनी केले.
समाजाच्या जडणघडणीत महिलांचे फार मोठे काम असून छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी घडविलं असून तोच आदर्श डोळयासमोर ठेऊन नवी पिढी घडविण्याचं कामही महिलाच करीत असल्याचे उप-आयुक्त निखिल मोरे म्हणाले.
प्रारंभी महाराणी ताराबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,अहिल्यादेवी होळकर आणि माजी पंतप्रधान स्वर्गिय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सुरुवातील महिला व बालकल्याण विभागाच्या अधिक्षक प्रिती घाटोळे यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात महिला दिनाच्या आयोजनाची माहिती दिली.