Women's Day 2018 कोल्हापूर- सांगली ‘लेडीज स्पेशल’ एस.टी सुरु!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 11:33 AM2018-03-08T11:33:14+5:302018-03-08T11:33:14+5:30
राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली. राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेटीमुळे महिला प्रवाशांनी एसटीला धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.
कोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाने महिला दिनानिमित्त महिला प्रवाशांसाठी गुरुवारी सुरु केलेल्या स्वतंत्र ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसला भरभरुन प्रतिसाद मिळाला. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी बस फुल्ल झाली.
राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या या महिला दिनाच्या अनोख्या भेटीमुळे महिला प्रवाशांनी एसटीला धन्यवाद देत शुभेच्छा दिल्या आहेत.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते या बसचे उद्घाटन करण्यात आले.
कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकांतून कोल्हापूर ते सांगली अशी सोडण्यात आलेली ही केवळ महिलांसाठीची बस उद्घाटनावेळीच हाऊसफुल्ल झाली. पहिल्याच दिवशी कोल्हापूरहून ४२ तर सांगलीहून ४५ अशा ८७ महिला प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला.
दैनंदिन संसाराचा गाडा सुरळीत चालण्यासाठी घर, संसार, मुलांबाळाचे संगोपन करून दररोज कामानिमित्त जाताना एस. टी.मधून प्रवास करताना महिलांना जागा न मिळणे, गाडीतील गर्दी यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. सकाळी दहा व सायंकाळी सहा वाजता प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन, खास महिलांसाठीच या विशेष गाडीचे नियोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी कोल्हापूर व सांगली विभागांच्या वतीने सुरु केलेल्या या ‘लेडीज स्पेशल’ एस. टी. बसमध्ये वाहक म्हणूनही महिला कर्मचारीच नियुक्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागणार नाही.
पहिल्या गाडीतील महिला प्रवाशांना महामंडळामार्फत गुलाबपुष्प देवून स्वागत करण्यात आल्या. महामंडळाने सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमामुळे महिला प्रवाशांनी आनंद व्यक्त केला. पहिल्याच गाडीला इतका भरभरुन प्रतिसाद मिळाल्याने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी आगार व्यवस्थापक सुनील जाधव, कामगार अधिकारी प्रविण पाटील, सुरक्षा अधिकारी सुनील भातमाने, लेखापाल उदय देशपांडे, स्थानक प्रमुख संजय शिंदे, अमित कलकुटकी, यांच्यासह मोठ्या संख्येने महिला कर्मचारी, महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
- - कोल्हापूर व सांगली विभागांतर्फे नियोजन
- - सकाळी व सायंकाळी दोन सत्रात
- - महिलांची गैरसोय टळणार.
अशी सुटणार गाडी
कोल्हापूर बसस्थानक : सांगलीकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वाजता परत
सांगली बसस्थानक : कोल्हापूरकडे सकाळी ९.१५ वा. मार्गस्थ व सायंकाळी ५.४५ वा. परत
महिला प्रवाशांच्या मागणीनुसार अन्य काही मार्गांवरही अशा प्रकाराच्या ‘लेडीज स्पेशल’ गाड्या सोडण्यात येणार आहेत.
शैलेंद्र चव्हाण,
विभाग नियंत्रक,
राज्य परिवहन महांमडळ, कोल्हापूर
मी एका खासगी कंपनीत सांगली येथे नोकरीस आहे. त्यामुळे दररोज कोल्हापूर - सांगली असा प्रवास करावा लागतो. घरातून निघताना नेहमी एकच गाडीत बसण्यासाठी जागा मिळणार का? हा प्रश्न नियमित पडत असत. मात्र,हा प्रश्न लेडिज स्पेशल एस.टीमुळे आता सुटला आहे.
- वृषाली यादव,
नोकरदार
माझा स्वत:चा व्यवसाय आहे. आठवड्यातीन किमान तीन ते चारवेळा मला सांगलीला जावे लागते. गाडीतून प्रवास करताना आपल्या शेजारी कोण असेल हा प्रश्न सार्वजनिक प्रवास नेहमीच येतो, मात्र ही फक्त महिलांसाठी गाडी असणार त्यामुळे थोडा आधार वाटतो.
- शुंभागी माने,
उद्योजिका