महिलांचा आहार
By admin | Published: March 31, 2016 12:32 AM2016-03-31T00:32:06+5:302016-03-31T00:33:03+5:30
डॉ. शिल्पा जाधव
आज प्रगतिशील देशांसमोर ज्या समस्या आहेत, त्यामध्ये ‘कुपोषण’ ही अतिशय भीषण समस्या आहे. गरीब घरातील व्यक्तींना अन्नपदार्थांचा तुटवडा असल्याने त्यांचे कुपोषण होत असते. त्याबरोबरच श्रीमंत सुखवस्तू घरातील व्यक्तीसुद्धा संतुलित आहाराबाबत अज्ञान, दुर्लक्ष या गोष्टींमुळे कुपोषित राहतात. या दोन्ही वर्गांमध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक असते.
घरी अन्नधान्याची सुबत्ता असूनही वजन कमी करण्याच्या मागे लागून अनेक स्त्रिया उपाशी राहतात किंवा भीतीमुळे अनेक पदार्थ वर्ज्य करतात आणि अधिकाधिक कुपोषित होतात. आपण कुपोषित आहोत का हे कसे ओळखायचे? त्वचा कोरडी होणे, त्वचेवर, नखांवर डाग येणे, डोळ््यांखाली सूज येणे व काळी वर्तुळे दिसणे, दात पिवळसर होणे, ओठ फुटणे, केस गळणे, केसांमध्ये कोंडा, शरीरावर सूज येणे, हाडांमधून आवाज येणे, दम लागणे, चेहरा निस्तेज दिसणे, उदास वाटणे, चिडचिड होणे, पाळीच्या तक्रारी, अंगदुखी, वजन कमी अथवा जास्त असणे ही कुपोषणाची काही
लक्षणे. आपल्याला यातील एक किंवा एकाहून अधिक समस्या असतील तर आपल्या आहारामध्ये पोषणमूल्यांची कमतरता आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.
खाण्याच्या वेळा सांभाळणे हे कसे महत्त्वाचे आहे याबद्दल आपण मागील लेखांमध्ये बोललो. तसेच आपल्या दिवसभराच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्त्वे, खनिजे योग्य प्रमाणात आहेत का, याबाबतही आपण दक्ष असले पाहिजे. नेहमी ताजे व स्वच्छ अन्न खावे. अन्नपदार्थ जेवढा शिळा होत जातो, तेवढे त्यातील पोषकतत्त्वांचे प्रमाण कमी होत जाते व जीवाणू, विषाणूंचे प्रमाण वाढत जाते.
भाज्या व फळे ही ताजी व अखंड स्वरूपात खावीत. त्यांचा रस काढू नये. दिवसातून एक ते दोन कपांवर चहा, कॉफी नको. उत्तेजक पेये, सोडा, फेसाळती पेये यांच्या अतिरिक्त सेवनामुळे स्नायूंची, हाडांची घनता कमी होते. बऱ्याच स्त्रिया या आठवड्यात कोणते ड्रेस, कोणत्या साड्या परिधान करायच्या याचे नियोजन करतात, तसेच नियोजन आठवड्याच्या आहाराचे व त्यासाठी लागणाऱ्या चीजवस्तूंचे करा.
आठवड्यातून दोन वेळा तरी भाजी, फळे आणून ठेवा. एकदम आठ-दहा दिवसांसाठी भाज्या, फळे फ्रीजमध्ये कोंबून ठेवू नका. एकाच वेळी खूप जास्त खाणे टाळा. त्यापेक्षा तोच आहार थोड्या थोड्या वेळाने विभागून खात राहा. एकदम भरपेट खाणे व नंतर उपवास करणे या दोन टोकाच्या गोष्टी करीत राहिलात, तर तुम्हाला शारीरिक वा मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. एका जागी स्थिर बसून शांतचित्ताने जेवण घ्या. जेवताना टी.व्ही., मोबाईल, लॅपटॉप बंद करून ठेवा.
आपल्या खराब मुडस्चा, रागाचा, अपमानाचा प्रभाव आपल्या खाण्या-पिण्यावर पाडणे हे चूकच. आपले पारंपरिक पदार्थ व त्यातील घटक जे आपले पूर्वज खात आलेले आहेत, ते घटक पचविण्यासाठी आपले शारीर निरनिराळ्या एन्झाइम्सची निर्मिती करीत असते. या गोष्टी सोडून पाश्चिमात्य पदार्थांचे स्तोम माजवून आपण आरोग्य व पैसा हे दोन्ही व्यर्थ खर्च करीत असतो. प्रक्रिया केलेले अन्न शक्य होईल तेवढे टाळा.
आपले शरीर आपल्याला भुकेची जाणीव करून देत असते. त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि इतर कुणी आपल्याला हे वर्ज्य करा, ते खावा असे सल्ले देत असेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी स्वत:ची बुद्धी वापरा; कारण आपले शरीर हे अमूल्य आहे, एकमेव आहे. शरीराचे योग्य भरणपोषण करून ते सुदृढ ठेवणे, निरामय ठेवणे ही आपल्या भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे असे समजा. कुपोषणाची समस्या वेळीच ओळखा. वेळीच रोखा. संतुलित आहाराचा अवलंब करा व निरोगी राहा.