गांधीनगरमध्ये हवालदाराने लगावली महिलेच्या कानशिलात
By admin | Published: June 15, 2015 12:48 AM2015-06-15T00:48:33+5:302015-06-15T00:48:49+5:30
कानाचा पडदा फाटला : ‘सीपीआर’च्या तपासणीमध्ये निष्पन्न; पोलीस ठाण्यातील धक्कादायक प्रकार
एकनाथ पाटील / कोल्हापूर
वाद कौटुंबिक, त्यामुळे मनाने खचलेल्या माउलीने न्याय्य हक्कासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावला. वाद कौटुंंबिक होता. तो सामंजस्याने मिटवायला हवा होता; परंतु येथील पोलीस हवालदाराने थेट त्या माउलीच्या कानशिलात लगावली. हताश झालेली ती माउली लेकीच्या आश्रयाला गेली; परंतु कानावर जोराचा मार लागल्याने तो दुखू लागला. त्यामुळे तिने शनिवारी (दि. १३) सीपीआरमध्ये तपासणी केली असता कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर तिने मारहाण करणाऱ्या हवालदाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. सीपीआर पोलीस चौकीतील अंमलदारांकडे तिने दाद मागितली. त्यांनी तिला गांधीनगर पोलिसांत जाण्यास सांगितले. तिथे गेल्यानंतरही कोणी दाद घेतली नाही.
महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्यामध्येही खास तरतूद आहे; परंतु वाद कौटुंबिक असतानाही थेट पोलीस ठाण्यातच तिच्यावर हात उचलण्याचे धाडस हवालदाराने केले कसे, त्याला तो अधिकार दिला कोणी? पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका सुरुवातीपासून पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची आहे. त्यामुळे हतबल झालेल्या सुरेखा राजू वाघमारे (वय ४५) यांना न्याय देऊन ते संबंधित हवालदारावर कठोर कारवाई करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सरनोबतवाडी येथे राहणाऱ्या सुरेखा राजू वाघमारे (वय ४५) या धुणी-भांड्याची कामे करून आपला उदरनिर्वाह चालवितात. सुखाचे दोन घास खात असतानाच त्यांचा मुलाशी कौटुंबिक वाद होऊ लागला. हा वाद अखेर गांधीनगर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला.
८ जून रोजी सहायक पोलीस निरीक्षक एस. ए. गायकवाड यांनी कौटुंबिक वाद असल्याने ९ जून रोजी संबंधित मुलग्याला व त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. दोघांचे म्हणणे ऐकून त्यांनी हा वाद एका हवालदाराकडे सोपविला. काही संघटनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी या वादामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हवालदाराने तोडगा काढण्याऐवजी पोलीस ठाण्यातच सर्वांसमोर सुरेखा वाघमारे यांच्या कानशिलात लगावली. तेथून त्या लेकीच्या आश्रयाला गेल्या. कान दुखू लागल्याने त्या ‘सीपीआर’मध्ये तपासणी करण्यासाठी नातवाला घेऊन आल्या. या ठिकाणी कान तपासला असता कानाचा पडदा फाटल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पडदा फाटल्यामुळे आॅपरेशनशिवाय पर्याय नाही, परंतु हलाखीच्या परिस्थितीत त्यांच्याजवळ औषधे घेण्यापुरतेही जवळ पैसे नाहीत. अशा बिकट परिस्थितीत त्यांनी कानशिलात लगावणाऱ्या हवालदाराविरोधात तक्रार देण्यासाठी सीपीआर पोलिसांकडे दाद मागितली असता त्यांनी त्यांना गांधीनगर पोलिसांकडे जाण्याचा सल्ला दिला; परंतु तिथेही त्यांची कोणी दाद घेतली नाही. महिलेला संरक्षण देण्याऐवजी तिच्यावरच हात उचलणाऱ्या हवालदारावर पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा या घटनेमुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या संदेशाला तिलांजली वाहण्याचा प्रकार होईल.
आमचा कौटुंबिक वाद मिटविण्याऐवजी पोलीस हवालदाराने माझ्या कानशिलात लगावली. त्यामुळे माझ्या कानाचा पडदा फाटला आहे. त्यांच्याविरोधात माझी तक्रार आहे; परंतु कोणीच दाद घेत नाहीत. - सुरेखा वाघमारे (तक्रारदार महिला)
सुरेखा वाघमारे यांचा मुलाबरोबर कौटुंबिक वाद आहे. त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली होती; परंतु हवालदाराने त्यांच्या कानशिलात लगावल्याचे मला माहीत नाही. तसा प्रकार घडला असेल तर तो गंभीर आहे. त्याबाबत माहिती घेऊन हवालदार दोषी आढळल्यास कारवाई केली जाईल.
- एस. ए. गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक