महिला भजनी मंडळ करणार मजरे शिरगावला व्यसनमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:44 PM2018-09-26T23:44:05+5:302018-09-26T23:44:12+5:30
नंदकुमार ढेरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाच्या महिला कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने गावात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असून, संपूर्ण गावाने व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
मजरे शिरगाव हे साधारण १००० लोकवस्तीचे गाव. सहा वर्षांपूर्वी सिद्धिविनायक महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. महिला मंडळाच्या अधिपत्याखालीच गावात सार्वजनिक गणेशाची स्थापना केली. स्वच्छता, प्लास्टिक बंदी, व्यसनमुक्ती, महिला आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप, गरीब कुटुंबांना आर्थिक मदत, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराचे वाटप, आदी उपक्रम या सुरू आहेत.
व्यसनाधिनतेमुळे कुटुंबाची होणारी वाताहात थांबावी म्हणून महिला व पुरुषांनी ज्या ठिकाणी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करता त्याच जागी आम्ही तंबाखू सेवन, मद्यपान करणार नाही, गुटखा किंवा अन्य शरीराला घातक असणाऱ्या पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी शपथ घेऊन ही शपथ न मोडण्याचाही निर्धार यावेळी ग्रामस्थांनी केला.
महिलांनी सहभाग घेतल्यास कोणतेही काम पूर्णत्वास जाते. गावच्या विकासात महिलांचा योग्य उपयोग करून घेतल्यास गावचा कायापालट नक्कीच होतो. या मंडळांच्या महिलांनी घेतलेला विकासाचा ध्यास आदर्शवत आहे.
सुनील सूर्यवंशी, बाबू सूर्यवंशी, महादेव सूर्यवंशी, राजेंद्र सामंत, विश्राम सासूलकर, गणपती वाके, महेश गावडे, ज्ञागेश्वर कुंदेकर, अनिल वाके, कमल सूर्यवंशी, पद्मा सामंत, पार्वती पाटील, स्नेहा सूर्यवंशी, धोंडूबाई गावडे, सुमन वाके, नीता कुंदेकर, स्वाती सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थांचा या कार्यात सहभाग आहे.