बॉक्साईड खाणीवर महिलांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:23 AM2021-04-08T04:23:49+5:302021-04-08T04:23:49+5:30
मलकापूर : बुरंबाळ ( ता. शाहूवाडी ) या गावातील मुलकीपड जमीन शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी रिंगेवाडी बॉक्साईड खाणीवर ...
मलकापूर : बुरंबाळ ( ता. शाहूवाडी ) या गावातील मुलकीपड जमीन शेतकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी रिंगेवाडी बॉक्साईड खाणीवर गुरुवार दि. ८ एप्रिल रोजी महिला बेमुदत उपोषण करणार असल्याचे निवेदन माजी पंचायत सदस्य, मुलकी पड संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष मनोहर कांबळे यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बुरंबाळ गावातील शेतकरी गेल्या तीन पिढ्या डोंगर उतारावरील मुलकीपड जमीन कसून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. शासनाने १९९३ साली मुलकी पड जमिनीचे वाटप केले होते. सहा महिन्यानंतर जमीन वाटपाचा आदेश करवीर उपविभागीय अधिकारी यांनी रद्द केला. कुटुंबाचा उदर निर्वाह करण्यासाठी शासन शेतकऱ्यांना जमीन देत नाही. बुरंबाळ गावात गट नंबर ६४ मध्ये गेली वीस वर्षे बॉक्साईड उत्खनन सुरू आहे. त्या उत्खननाचा संपूर्ण गावाला त्रास होत आहे. पिण्याचे पाणी दूषित होत आहे . जोपर्यंत शासन शेतकऱ्यांना मुलकी पड जमीन नावावर करून देत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा शेतकरी महिला यांनी दिला आहे.
निवेदनावर मुलकी पड संघर्ष समितीच्या पूजा कदम, मनोहर कांबळे, सुनील कांबळे, दगडू गुरव यांच्यासह पंच वीस महिलांच्या सह्या आहेत .