‘सावित्रीबाई’मध्ये महिलांचे स्वतंत्र रुग्णालय

By Admin | Published: April 12, 2017 01:15 AM2017-04-12T01:15:13+5:302017-04-12T01:15:13+5:30

अमल महाडिक : तीन कोटींचा निधी राज्य सरकार देणार

Women's independent hospital in Savitribai | ‘सावित्रीबाई’मध्ये महिलांचे स्वतंत्र रुग्णालय

‘सावित्रीबाई’मध्ये महिलांचे स्वतंत्र रुग्णालय

googlenewsNext

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयात खास महिलांकरिता शंभर खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात येणार असून, त्यास राज्य सरकारने दोन कोटी तर जिल्हा नियोजन मंडळातून एक कोटी असा तीन कोटींचा निधीही तयार असल्याची माहिती आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी महानगरपालिकेत पत्रकारांशी बोलताना दिली. प्रसूतिपूर्व चाचण्यांपासून प्रसूतिपश्चात उपचारांसह महिलांच्या विविध आजारांवर येथे उपचार केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार अमल महाडिक यांनी मंगळवारी सायंकाळी महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्ष व ताराराणी आघाडीचे सर्व नगरसेवक-नगरसेविकांसह आयुक्त अभिजित चौधरी यांच्याशी शहराच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यावेळी बहुतेक सर्वच नगरसेवकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी आणि शहरातील प्रश्न आमदारांसमोरच आयुक्तांकडे मांडले.
बैठक संपल्यानंतर आमदार महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महानगरपालिकेच्या सावित्रीबाई फुले रुग्णालयातून व्यवस्थित औषधोपचार होत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या.
त्यानुसार आपण राज्य सरकारच्या संबंधित मंत्र्यांशी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून याच सावित्रीबाई फुले रुग्णालयात खास महिलांसाठी १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून दोन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाल्याचे पत्रही मला मिळाले आहे. एक कोटी रुपये जिल्हा नियोजन मंडळातून मंजूर झाले आहेत. महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू झाल्यास प्रत्येक वर्षी सरकारकडून अनुदान मिळणार आहे.
राजीव गांधी आरोग्यदायी योजना सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. महापालिकेने स्वनिधीतून ५० लाख रुपयांचा निधी ‘अतिदक्षता विभाग’ सुरू करण्याकरीता राखून ठेवला आहे. ‘अतिदक्षता विभाग’ सुरू झाला की मग ही योजना सुरू करता येईल. त्याचा पाठपुरावा आपण करत असल्याचेही आमदार महाडिक यांनी सांगितले.
यावेळी शहरातील कचरा उठावाचे नियोजन करण्यात यावे, थेट पाईपलाईन योजनेवर अधिकाऱ्यांची नियुक्त्या कराव्यात, घरफाळा विभागाची थकबाकी वसूल करावी, बायोमॅट्रीक यंत्रणेत सुधारणा करण्यात यावी, टर्न टेबल लॅडर वाहन उपलब्ध करून द्यावे, रंकाळा प्रदूषण टाळण्याकरिता उपाययोजना राबवाव्यात, रिंगरोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, पाणीपुरवठ्यातील असमतोल दूर करावा, आदी विविध सूचना यावेळी नगरसेवकांनी केल्या.
चर्चेत सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, ईश्वर परमार, अजित ठाणेकर, संतोष गायकवाड, पूजा नाईकनवरे, शेखर कुसाळे, कविता माने, रूपाराणी निकम, अश्विनी बारामते, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, आर. डी. पाटील, अशोक देसाई, आदींनी चर्चेत भाग घेतला.

‘पी हळद, हो गोरी’
असं होणार नाही
शहरातील प्रश्नांची माहिती करून घेत आहे. आपल्याकडूनही आज अनेक प्रश्न समजले. सर्व प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न नक्कीच राहील; परंतु ‘पी हळद, हो गोरी’ असं होणार नाही. सर्वच ठिकाणी चांगले परिणाम मिळतील असे नाही, म्हणूनच आपण प्रश्नांचा प्राधान्यक्रम ठरवून ते सोडविण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आयुक्त अभिजित चौधरी यांनी यावेळी दिली.


स्वतंत्र अधिकारी नेमा : महाडिक
राज्य सरकारच्या अनेक योजना शहरात राबविता येण्यासारख्या आहेत; परंतु महानगरपालिकेचे अधिकारी अशा योजनांपर्यंत पोहोचत नाहीत. त्यामुळे योजना असूनही शहराला त्याचा लाभ होत नाही, म्हणून अशा योजना आणण्याकरिता महापालिकेचा एक वरिष्ठ अधिकारी नेमा. हा अधिकारी महापालिका, शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून काम करेल. मंत्रालयात आम्ही त्याचा पाठपुरावा करू. लागणारा निधी उपलब्ध करून घेऊ, पण पाठपुराव्याकरिता खास अधिकारी नेमावा, अशी सूचना आमदार अमल महाडिक यांनी केली.

Web Title: Women's independent hospital in Savitribai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.