जल्लोषात विमेन मिडनाईट बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:59 AM2018-10-15T00:59:52+5:302018-10-15T00:59:55+5:30
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित केलेल्या कोल्हापूरच्या इतिहासातील पहिल्या ‘विमेन मिडनाईट बाईक ...
कोल्हापूर : नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी ‘लोकमत सखी मंच’तर्फे आयोजित केलेल्या कोल्हापूरच्या इतिहासातील पहिल्या ‘विमेन मिडनाईट बाईक रॅली’च्या माध्यमातून महिला, युवतींनी ‘निर्भया नको, निर्भय बना’ अशी साद रविवारी शहरवासीयांना दिली. महिला, युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जल्लोषी वातावरणात शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले.
महिलांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘लोकमत’ने मिडनाईट दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. या निमित्ताने सायंकाळी सात ते नऊ या वेळेत दसरा चौकामध्ये वैविध्यपूर्ण जल्लोषी कार्यक्रम रंगला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मधुरिमाराजे, भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक,
कोल्हापूर महिला सहकारी बँकेच्या अध्यक्षा शैलजा सूर्यवंशी, निसर्गाेपचार तज्ज्ञ रेखा सारडा, सफर टूर्स अॅँड ट्रॅव्हल्सच्या संचालिका गीतांजली शर्मा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांनी प्रमुख उपस्थितांचे रोप देऊन स्वागत केले.
सर्पमित्र व युवा कार्यकर्ती ऐश्वर्या मुनीश्वर, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू रेश्मा माने यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेविका उमा इंगळे, बुलेट रायडर गायत्री पटेल, सहायक पोलीस निरीक्षक रिझवाना नदाफ उपस्थित होत्या. ‘सखी मंच’ संयोजिका प्रिया दंडगे आणि प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
बाईक रॅलीची प्रारंभ रात्री नऊ वाजता महापौर शोभा बोंद्रे, करवीर आदर्श संस्थेच्या अध्यक्षा प्रतिमा सतेज पाटील, अनिता देवानंद शिंदे यांच्या हस्ते फ्लॅग दाखवून करण्यात आला. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत रॅली निघाली.
तुतारीचा निनाद आणि शिवसह्याद्री ढोलताशा पथकाने परिसर दणाणून सोडला. व्हीनस कॉर्नर, ताराराणी चौक, टेंबलाई उड्डाणपूल, टाकाळा, राजारामपुरी चौक, बागल चौक, उमा टॉकीज या मार्गावरून रॅली पुन्हा दसरा चौकात आली.
रॅलीसाठी पोलीस पायलटसह शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल गुर्जर, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले. या रॅलीमध्ये विविध क्षेत्रांतील महिला, युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मलाबार गोल्ड, सफर टुर्स अॅँड ट्रॅव्हल्स, चाटे शिक्षणसमूह आणि कोल्हापूर महिला सहकारी बँक हे या कार्यक्रमाचे प्रायोजक होते.
नारीशक्तीचा आविष्कार
या रॅलीपूर्वी दसरा चौकात जीवनकल्याण मंदिरच्या विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ सादर केले. शिवालय नृत्यमंदिरच्या कलाकारांनी गणेशवंदन केले. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्र्थिनींनी ‘नो मिन्स नो’ या लघुनाटिकेतून स्त्रीसन्मानाचा संदेश दिला.
डी. के. डान्स अकॅडमी, सायक्लॉन अकॅडमी, श्वास अकॅडमीच्या कलाकारांनी नृत्यातून नारीशक्तीचा आविष्कार सादर केला.
चौकाचौकांत रॅलीची चर्चा
भगवे फेटे बांधलेल्या, बुलेटसह अन्य दुचाकींवर बसलेल्या नऊवारीसह जीन्समधील महिला आणि युवतींची ही रॅली निघाल्यानंतर चौकाचौकांतील नागरिकांमध्ये या नावीन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा सुरू झाली.
संपूर्ण मार्गावर अनेक नागरिक आणि महिलांनी या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिला आणि युवतींना हात उंचावून प्रतिसाद दिला.