कार्तिक स्वामी दर्शनासाठी कोल्हापुरात महिलांच्या रांगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 01:54 PM2018-11-23T13:54:35+5:302018-11-23T13:57:47+5:30
भगवान शिवशंकरांचे पुत्र असलेल्या कार्तिक स्वामी यांचे दर्शन महिलांना केवळ कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते. त्यामुळे यंदा ‘कृत्तिका नक्षत्र’ या मुहूर्तावर हा योग गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून सुरू झाला.
कोल्हापूर : भगवान शिवशंकरांचे पुत्र असलेल्या कार्तिक स्वामी यांचे दर्शन महिलांना केवळ कार्तिक पौर्णिमेलाच घेता येते. त्यामुळे यंदा ‘कृत्तिका नक्षत्र’ या मुहूर्तावर हा योग गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून सुरू झाला. त्यामुळे असंख्य भाविकांनी जोतिबा रोडवरील कार्तिक स्वामी मंदिरात गर्दी केली होती.
दरवर्षी दिवाळीनंतर त्रिपुरारी पौर्णिमा व कृत्तिका नक्षत्र या योगावर कार्तिक स्वामी दर्शन सोहळा घेण्याचा योग येतो. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेला हा योग आज, शुक्रवारी दुपारी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत भाविकांना घेता येणार आहे. हा योग कार्तिक पौर्णिमेलाच येत असल्याने या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी महिलांची गर्दी उसळते. त्यानुसार गुरुवारी दुपारी तीन वाजल्यापासूनच अंबाबाई मंदिरासह या परिसरात दर्शनासाठी एकच गर्दी झाली होती.
विशेषत: कार्तिक स्वामी यांचे दर्शन घेतल्यानंतर वैवाहिक जीवन सुखी व धनसंपत्तीमध्ये वृद्धी होते, अशी आख्यायिका आहे. यानिमित्त मंदिराचे पुजारी शांतीनाथ कदम यांच्या हस्ते अभिषेक व पूजाविधी झाला. मोरपीस, गूळ-खोबरे अर्पण करून भाविकांनी दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. त्यामुळे दर्शनासाठी गर्दी झाल्याने रांग अंबाबाई मंदिराच्या पूर्व दरवाजापर्यंत पोहोचली होती.