मायक्रोफायनान्स कंपनीच्या तगाद्यामुळे महिलांचा आत्महत्येचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 02:21 PM2020-06-12T14:21:28+5:302020-06-12T14:23:19+5:30
रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा दिला असुन त्यास पूर्णपणे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असेही महिलांनी सांगितले.
कळे : कोरोनाच्या संसर्गाने झालेल्या लॉकडाऊनमुळे गेले जवळपास पावणेतीन महिने ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांच्या हाताला काम नाही. रोजगार नसल्याने आधीच उपासमारीची वेळ आलेल्या महिलांना जून महिन्यापासून मागील तीन महिन्यांचे कर्जाचे हप्ते चक्रवाढ व्याजासह भरण्याचा तगादा मायक्रो फायनान्स कंपनीने लावला आहे. त्यामुळे ग्रामीण कष्टकरी महिला अडचणीत आल्या आहेत. महिलांनी आत्महत्येचा इशारा दिला असुन त्यास पूर्णपणे संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असेही महिलांनी सांगितले.
सावर्डे तर्फ असंडोली( ता. पन्हाळा) येथे गुरुवार (दि. ११) रोजी सकाळी नऊ वाजता एका खासगी मायक्रो फायनान्स कंपनीचा प्रतिनिधी महिलांनी घेतलेल्या कर्जाच्या हप्त्यांची वसुली करण्यासाठी आला होता. त्यावेळी प्रक्षुब्ध झालेल्या महिलांनी त्यास इशारा दिला.
कोरोनामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाने गत तीन महिने हप्ते भरणे बंद होते, तथापि आज गुरुवार ( दि.११) रोजी संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीने गत तीन महिन्यांचे हप्ते चक्रवाढ व्याज पद्धतीने त्वरित भरा असा तगादा लावल्याने महिला आक्रमक झाल्या व त्यांनी आत्महत्येचा इशारा दिला.
गेले तीन महिने कोरोनामुळे या कष्टकरी महिलांच्या हाताला रोजगार नाही. पुढील चार महिने पावसामुळे रोजगार मिळणार नाही. संबंधित कंपनीने आम्हास सप्टेंबर अखेर हप्ते भरण्यास सुट द्यावी, चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करू नये, अन्यथा काही महिला आत्महत्या करतील व त्यास संबंधित मायक्रो फायनान्स कंपनीच जबाबदार असेल असाही इशारा महिलांनी दिला.
ग्रामीण भागातील आम्ही कष्टकरी महिलांनी एकत्र येऊन संसाराचा गाडा चालवण्यासाठी एका खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. कोरोनामुळे गेले तीन महिने हप्ते भरणे बंद होते. थकित हप्ते आता चक्रवाढ व्याज पध्दतीने आकारून हप्ते भरण्याचा कंपनीने तगादा लावला आहे. "कर्जमुक्ती" करुन शासनाने महाराष्ट्रातील सर्वच कष्टकरी महिलांची या विळख्यातुन मुक्तता करावी.
अलका भिकाजी काळे.
सावर्डे तर्फ असंडोली, (ता. पन्हाळा).