महिला तलाठीला धक्काबुक्की, काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:35+5:302021-06-09T04:28:35+5:30
कोल्हापूर : नंदुरबारमधील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तलाठ्यांना शनिवारी केलेली धक्काबुक्की व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापुरातील ...
कोल्हापूर : नंदुरबारमधील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तलाठ्यांना शनिवारी केलेली धक्काबुक्की व मारहाणीच्या निषेधार्थ सोमवारी कोल्हापुरातील तलाठ्यांनी काळ्या फिती व काळे मास्क लावून आंदाेलन केले. यावेळी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे कारवाईसाठी जाणाऱ्या पथकाला सुरक्षा पुरविण्याची मागणी करण्यात आली.
या निवेदनात पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांनी यापूर्वी कोल्हापुरात तलाठी म्हणून काम केले आहे. त्या कारवाईसाठी गेल्या असता, नंदुरबारमधील वाळू डंपरचे मालक नगरसेवक गौरव चौधरी यांनी शनिवारी त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली. तसेच शिवीगाळ करुन स्वत:चा बचाव करण्यासाठी पैसे मागितल्याचे खोटे आरोप केले आहेत. त्यांच्यावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, पथकाचे नेतृत्व किमान नायब तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्याकडे द्यावे, पथकाला शासकीय वाहन तसेच हत्यारबंद पोलीस कर्मचारी द्यावेच, वाहतूक होणाऱ्या गौण खनिजाचे परिमाण योग्य आहे का, हे तपासण्यासाठी परिवहन विभागाचे कर्मचारी सोबत असावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघाचे अध्यक्ष धनाजी कलिकते, चिटणीस अनंत दांडेकर, शिवकुमार पाटील, भाऊसो खोत, शिवकुमार पाटील, करवीर तालुकाध्यक्ष शामराव कांबळे, जानकी मिराशी यांच्यासह तलाठी उपस्थित होते.
---