महिला कुस्तीला मिळाली नवी सृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:19+5:302021-07-10T04:17:19+5:30

रमेश वारके बोरवडे : दि. १६ ते २२ ऑगस्टदरम्यान रशियात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार ...

Women's wrestling got a new creation | महिला कुस्तीला मिळाली नवी सृष्टी

महिला कुस्तीला मिळाली नवी सृष्टी

Next

रमेश वारके

बोरवडे : दि. १६ ते २२ ऑगस्टदरम्यान रशियात होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय कुस्ती महासंघाने संघ निवड चाचणी आयोजित केली असून महाराष्ट्रातील चार महिला मल्लांची यासाठी निवड केली आहे. यामध्ये बिद्री (ता. कागल) येथील सृष्टी जयवंत भोसले हिची निवड झाली आहे. ग्रामीण भागातील सृष्टी भोसले या ‘दंगल गर्ल’ची कुस्तीतील प्रेरणादायी यशोगाथा अन्य मुलींसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारी आहे.

वडील जयवंत यांनी सृष्टीलाही लहानपणापासूनच कुस्तीचे धडे शिकवले. चौथीपर्यंत त्यांनी सृष्टीला स्वतः मार्गदर्शन केले, तर त्यानंतर तिला मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक साई कुस्ती केंद्रात दाखल केले.

या ठिकाणी एनआयएस कोच दादासाहेब लवटे, तालमीचे अध्यक्ष सुखदेव येरुडकर, मार्गदर्शक दयानंद खतकर यांनी तिच्यातील क्षमता ओळखून तिला सखोल मार्गदर्शन केले. गेली दहा वर्षे ती या केंद्रात दररोज सराव करते.

सृष्टीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील कुस्ती स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. २०१५ साली राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत तिला पहिले पदक मिळाले. त्यानंतर अहमदाबाद येथील स्पर्धेत ब्राँझपदक, परभणी येथे नॅशनलमध्ये सुवर्णपदक, धुळे येथे नॅशनलमध्ये रौप्यपदक, तर २०१९ साली राज्य शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. नागपूर येथे झालेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत ६० किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत ती मानधनधारक मल्ल ठरली आहे. कोल्हापूर महापौर चषक स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर इचलकरंजीतील युगंधरा फौंडेशनच्या स्पर्धेत मानाची चांदीची गदा मिळविली आहे.

२०१९ साली नवी दिल्लीत झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत ब्राँझपदक मिळवत सृष्टीने कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेचा झेंडा राजधानीत फडकावला आहे. मार्चमध्ये बेल्लारीत (कर्नाटक) झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेत भारतीय कुस्ती महासंघाने तिला भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेसाठी निमंत्रित केले आहे. रशियात १६ ते २२ ऑगस्टदरम्यान जागतिक कुस्ती स्पर्धा होत असून दिल्लीत ५ जुलैपासून भारतीय संघ निवड चाचणी स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रातील चार महिला मल्लांचा सहभाग असून सृष्टी भोसले ही त्यापैकी एक आहे.

Web Title: Women's wrestling got a new creation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.