करनूरच्या कुंभार कुटुंबीयांचा कौतुकास्पद पायंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 11:58 PM2019-06-02T23:58:46+5:302019-06-02T23:58:51+5:30
जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न ...
जहाँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : सर्वसाधारणपणे रजिस्टर लग्न म्हणजे कुटुंबाचा विरोध म्हणून पळून जाऊन केलेले लग्न असा अनेकांचा ग्रह आहे. काही अपवाद वगळता अॅरेंज मॅरेज हे रजिस्टर पद्धतीने होत नाही; पण करनूर (ता. कागल) आणि वाकरे (ता. करवीर) येथील बऱ्यापैकी सधन असलेल्या कुंभार कुटुंबीयांनी सामाजिक भान जपत असा विवाह केला आहे. हॉलचे भाडे, सजावट, संगीत, बेंडबाजा, आहेर-माहेर असा सर्व खर्च टाळून ती रक्कम सामाजिक दातृत्वासाठी खर्च करण्याचा आणि त्यासाठी सर्वांच्या उपस्थितीत रजिस्टर पद्धतीने विवाह करण्याचा कौतुकास्पद पायंडा पाडला.
करनूर येथील तानाजी निवृत्ती कुंभार यांचा मुलगा प्रवीण (बी. ई. सिव्हिल) आणि अशोक भिवाजी कुंभार यांची मुलगी पूजा (बी. टेक. फूड टेक्नॉलॉजी) या दोघांचा विवाह बुधवारी (दि. २९) कोल्हापूर येथील रजिस्टर कार्यालयात नोंदणी पद्धतीने झाला. मूळचे कोगनोळी (ता. चिक्कोडी) येथील तानाजी कुंभार हे शेती खरेदीमुळे करनूरकर झाले. प्रगतिशील शेतकरी असलेले कुंभार हे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल, समता परीषदेचे जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. आपल्या मुलाचा विवाह रजिस्टर पद्धतीने करून खर्च वाचवायचा व ती रक्कम गरीब घरातील मुलींच्या विवाहासाठी खर्च करायची, असा निर्धार केला होता. पत्नी आक्काताई, व मुले यांनीही मान्यता दिली. मुली पाहताना याची कल्पना ते आधीच देत. वाकरे येथील हे स्थळ जुळले. हे कुटुंबही तसे सधन आहे. पण, केवळ नारळपानाचा विडा एवढ्यावर ठरलं. मुलीचे आजोबा (आईचे वडील) राजाराम कुंभार (रा. कुडित्रे) व आई-वडील यांनाही हा उपक्रम आवडला आणि दीड महिन्यापूर्वी नोंदणी केली.
सहा गरीब मुलींच्या नावावर ठेवी
थाटामाटाचा, डौलदार पद्धतीचा विवाह टाळल्याने साधारणत: तीन लाख रुपये खर्च वाचला. त्यातील काही रक्कम त्यांनी सहा मुलींच्या नावावर राष्ट्रीयीकृत बॅक आणि एल.आय.सी.मध्ये ठेवली आहे. वयानुसार या रकमा ३५ हजार ते ८0 हजार रुपयांपर्यंत आहेत. तसेच करनूर येथे बोअर मारण्यासाठी दहा हजार रुपये, शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यासाठी दहा हजार रुपये, तर काही मुलींच्या लग्नांना सढळ हाताने मदत केली आहे. गरीब आणि दोनपेक्षा अधिक मुली ज्या घरात आहेत, अशा ठिकाणी हा खर्च केला आहे.
कार्यालयातील कर्मचारीही आनंदले : एरवी ताणतणाव, विरोधाचा दबाव, नातेवाइकांचा अभाव, तक्रारी, साक्षीदारांच्या अनेक तºहा, अशा वातावरणात विवाह नोंदणी करणाºया अधिकारी आणि कर्मचारी वर्गालाही कुंभार कुटुंबीयांच्या या उपक्रमाने उत्साहित केले. नवरा किंवा नवरी यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. विशेषत: दोन्हींचे माता-पिता सहीसाठी मिळून आले आहेत. असा प्रसंग नोकरी काळात क्वचितच पाहावयास मिळतो. काहीनी तर गेल्या ३0-३५ वर्षांच्या नोकरीच्या काळात पहिलाच असा विवाह पाहिला, अशा भावना येथील कर्मचाºयानी व्यक्त केल्या.