रांगड्या कुस्ती निवेदनाचे ‘पावशतक’
By Admin | Published: January 12, 2017 10:10 PM2017-01-12T22:10:56+5:302017-01-12T22:10:56+5:30
गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धा : दोनवडेच्या यशवंतअण्णांचा थक्क करणारा प्रवास
प्रकाश पाटील --कोपार्डे १९८०ला यवलूज (ता. पन्हाळा) येथील कुस्ती मैदानात यशवंत पाटील यांनी स्वत: कुस्ती केली आणि आपल्या दोनवडे (ता. करवीर) गावातील कुस्ती मैदानाची जाहिरात वाचण्यास माईक हातात घेतला अन् तेथूनच त्यांच्या कुस्ती मैदानातील निवेदनाचा प्रवास सुरू झाला. गावची यात्रा ते हिंदकेसरी स्पर्धेतील कुस्त्यांचे निवेदन त्यांनी केले. ‘हिंदकेसरी’ या चित्रपटातील दारासिंग व पै. हरी पाटील (महे) यांच्यात झालेल्या कुस्तीचे निवेदनही यशवंत पाटील यांनीच केले.
मैदानात कुस्ती चालू असताना मल्ल एकमेकांवर कोणत्या डाव-प्रतिडावांचा वापर करतात याची माहिती आपल्या दमदार आवाजात ते सांगतात. अगदी पणजोबांपासून कुस्तीपरंपरा त्यांच्या घराण्यात असल्याचे ते आवर्जून सांगतात. आर्थिक अडचणींमुळे त्यांना स्वत:ला कुस्तीक्षेत्रात पैलवान म्हणून फार काम करता आले नाही; पण अनेक होतकरू मल्लांना त्यांनी पुढे आणले.
आपल्या ‘कुस्ती निवेदक’ म्हणून सुरू झालेल्या प्रवासाची पाने उलगडताना त्यांनी सांगितलेली ही आठवण मोठी रंजक आहे. १९८० मध्ये यवलूज येथील कुस्ती मैदानासाठी यशवंत पाटील गेले होते. तेथे आपल्या गावातील कुस्ती मैदानाची तारीख व जाहिरात वाचण्यासाठी त्यांनी माईक हातात घेतला. नेमके याचवेळी या मैदानात निवेदन करणाऱ्या निवेदकांचा आवाज बसल्याने त्या जाहिरात वाचणाऱ्या मुलाला बोलवा, असे कुस्ती संयोजकांनी सांगितले आणि त्या दिवशी घेतलेला माईक अजूनही त्यांनी खाली ठेवलेला नाही.
१९८१ ला जिल्हा तालीम संघाने कुस्ती मैदान आयोजित केले होते. यावेळी कुस्तीतील भीष्माचार्य बाळ गायकवाड यांनी त्यांची विचारपूस करून निवेदन करण्यास सांगितले. त्यावेळी संयोजक गणपतराव आंदळकर यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांनी यशवंत पाटील यांना जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे सदस्यपद बहाल केले. ते आजही कायम आहे.
१९८२ला कोल्हापूर येथे ‘महान भारत केसरी’ची लढत दादू चौगले व सादिक पंजाबी यांच्यात झाली. यावेळी त्यांना साईड कॉमेंट्रीची संधी मिळाली होती. या लढतीवेळी बाळ गायकवाड यांनी, ‘यशवंतच्या हातात माईक द्या’, असे सांगितले आणि ‘राम राम मंडळी’ असं त्यांनी म्हणताच मैदानात एकच जल्लोष झाला. हा आपल्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असल्याचे निवेदक यशवंत पाटील-दोनवडेकर यांनी सांगितले.
कुस्तीसम्राट युवराज पाटील व पै. सतपाल यांची ऐतिहासिक कुस्ती झाली. या कुस्तीचे थेट निवेदन आकाशवाणी सांगली केंद्रावरून प्रसारित होणार होते. त्यांच्या आवाजातील रांगडेपणा पाहून निवेदन करण्याची संधी त्यांना देण्यात आली होती. विष्णू जोशीलकर हे ‘महाराष्ट्र केसरी’ झाले, त्यावेळीही संपूर्ण स्पर्धेचे निवेदन त्यांनीच केले होते.
१९९५ला यशवंत पाटील यांना कृष्णा कारखान्याच्या कुस्ती निवेदनासाठी बोलविण्यात आले. उद्घाटनाच्या कुस्तीला प्रारंभ झाला व वादाला सुरुवात झाली. त्यांनी निवेदनाला सुरुवात करताच कुस्तीसाठी डोकीफोड करणारी म्हणून प्रसिद्ध असणारी ही स्पर्धा शांततेत पार पडली. कुस्ती निवेदनातील या कामाबरोबरच अनेक नवे मल्ल घडविण्याचे कामही त्यांनी केले आहे.