अंबाबाईच्या गाभाऱ्यात बसविणार लाकडी खिडक्या
By admin | Published: June 23, 2016 12:45 AM2016-06-23T00:45:12+5:302016-06-23T01:07:35+5:30
देवस्थान समितीचा निर्णय : वेदर स्टेशनची आठ दिवसांत सोय, निविदा प्रसिद्ध
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मूर्तीचे जतन, संवर्धनासाठी व गाभाऱ्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी लाकडी खिडक्या बसविण्यात येणार आहेत. याशिवाय मंदिरातील तापमान व आर्द्रता मोजण्यासाठी वेदर स्टेशन सुरू करण्याचा निर्णय बुधवारच्या देवस्थान समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनासाठी देवस्थान समितीने नियुक्त केलेल्या शिवाजी विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख पी. डी. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आर्द्रता समिती कार्यरत आहे. अंबाबाई मूर्तीचे रासायनिक संवर्धन झाल्यानंतर पुरातत्त्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी मूर्ती संवर्धनासाठी काही नियम घालून दिले होते. मात्र, त्याचे अद्यापही पालन होत नसल्याने त्याचा परिणाम मूर्तीवर होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पी. डी. राऊत, देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे, पर्यावरणतज्ज्ञ उदय गायकवाड, श्रीपूजक केदार मुनीश्वर, माधव मुनीश्वर, विवेकानंद महाविद्यालयाचे मिलिंद कारंजकर, अभियंता सुदेश देशपांडे उपस्थित होते.
यावेळी पुरातत्त्व खात्याने दिलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींचा आढावा घेण्यात आला.
गाभाऱ्यातील आर्द्रता कमी व्हावी व हवा खेळती राहावी, यासाठी गाभाऱ्यात लाकडी खिडक्या बसविण्याचा निर्णय झाला. मॉडेल म्हणून एक लाकडी खिडकी बनविली होती. त्याला सदस्यांनी मान्यता दिली.
गाभाऱ्यासह मंदिरातील तापमान व आर्द्रता मोजता यावी, यासाठी वेदर स्टेशन बसविण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा देवस्थानच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आली असून, आता केवळ आॅर्डर काढणे बाकी आहे. येत्या आठ दिवसांत हे वेदर स्टेशन मशीन कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे.
अंबाबाई मंदिर गाभारा : श्रीपूजकांसाठी सूचना
गाभाऱ्यात कमीत कमी पाण्याचा वापर केला जावा, अशी सूचना श्रीपूजकांना केली.
पाण्याचा साठा करावा लागू नये, यासाठी २४ तास पाण्याचे कनेक्शन देण्यात येणार असून, त्याचा प्रस्ताव महिन्यापूर्वी महापालिकेला पाठविला आहे.
नवरात्रीत मंदिर पाण्याने धुऊन काढले जाते. यावर्षीपासून मंदिर न धुता केवळ व्हॅक्यूम क्लीन करण्यात येणार आहे.
देवीची पूजा बांधताना कमीत कमी फुलांचा वापर करावा, अशा सूचना श्रीपूजकांना दिल्या आहेत.
कोणत्याही भाविकाला मंदिराच्या परिसरात फुलांची सजावट करायला परवानगी देण्यात येणार नाही.
मंदिरात सर्वत्र एलईडी बल्ब बसवले असून, दुकानदारांना व व्यापाऱ्यांनाही तशा लेखी सूचना देण्यात येणार आहेत.