कोल्हापुरात दिवसभर कडकडीत ऊन, धरणक्षेत्रातही उघडझाप, नद्यांची पातळी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 04:34 PM2019-07-18T16:34:28+5:302019-07-18T16:36:15+5:30
कोल्हापूर शहरासह बहुतांशी तालुक्यांत दिवसभर कडकडीत ऊन राहिले. आॅक्टोबर हिटप्रमाणे उन्हाचा तडाका शहरात जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण झाली आहे. अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह बहुतांशी तालुक्यांत दिवसभर कडकडीत ऊन राहिले. आॅक्टोबर हिटप्रमाणे उन्हाचा तडाका शहरात जाणवत होता. धरणक्षेत्रातही पावसाची उघडझाप असल्याने नद्यांच्या पातळीत घसरण झाली आहे. अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.
गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात पावसाने काहीसी उसंत घेतली आहे. मागील दोन दिवस उघडझाप होती; पण आज मात्र कडकडीत ऊन राहिले. गगनबावडा तालुक्यात मात्र अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.२४ तासांत जिल्ह्यात ८९.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक ४७ मिलिमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला.
धरणक्षेत्रातही उघडझाप आहे, राधानगरी धरणातील प्रतिसेकंद १२०० घनफूट पाण्याचा विसर्ग कायम आहे. कासारी व कडवी धरणातून अनुक्रमे २५० व १५० घनफूट विसर्ग सुरू आहे. पंचगंगेची पातळी २२.४ फूटापर्यंत खाली आली असून, अद्याप १२ बंधारे पाण्याखाली आहेत.
खासगी मालमत्तेची पडझड होऊन १0 हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. पावसाने एकदमच दडी मारली आणि उन्हाचा तडाखा सुरू झाल्याने लोकांना आॅक्टोबर हिटचा अनुभव येत आहे.